रत्नागिरी : वाटद खंडाळा येथील एका ३५ वर्षीय तरुणाने दारूच्या व्यसनातून पत्नीसोबत फोनवर झालेल्या वादानंतर गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १९ जुलै रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली.
मदन मोहन कामटी (वय ३५, मूळ रा. हरीरपूर बक्षीटोल, ता. कलवाही, जि. मधूबनी, राज्य बिहार, सध्या रा. वाटद खंडाळा, सेंट्रल बँकेसमोर, संतोष पगारे यांच्या चाळीत भाड्याने) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मदन मोहन कामटी हे दारूच्या व्यसनी होते. काल मध्यरात्रीच्या सुमारास त्यांनी आपल्या पत्नीसोबत फोनवर बोलताना वाद घातला. या वादामुळे व्यथित होऊन त्यांनी स्वतः राहत असलेल्या भाड्याच्या घरात सिलिंग फॅनला टॉवेलच्या साहाय्याने गळफास लावून घेतला.
घटना लक्षात येताच, त्यांना तातडीने प्रा. आ. केंद्र वाटद खंडाळा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
वाटद खंडाळा येथे दारूच्या नशेत पत्नीसोबतच्या वादातून तरुणाची आत्महत्या
