येत्या आठ दिवसांत उपायजोना न झाल्यास आंदोलन करणार : प्रथमेश गावणकर
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड ते हातखंबा हा महत्त्वाचा रस्ता सध्या सर्वसामान्य जनतेसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. मागील काही महिन्यांपासून या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे निष्पाप लोकांचे बळी जात असल्याचा खळबळजनक आरोप खंडाळा पंचक्रोशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी केला आहे. नुकत्याच हातखंबा येथे झालेल्या भीषण अपघातात एका २० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रस्त्यावर अपघातांची वाढती मालिका सुरू होण्यामागे मुख्य कारण म्हणजे पोर्टची वाढलेली मालवाहतूक आणि त्या तुलनेत रस्त्याची झालेली दुरवस्था. साधारणतः २००५ पासून जेएसडब्ल्यू पोर्ट आणि आंग्रे पोर्टच्या माध्यमातून या रस्त्यावरून मालवाहतुकीची सुरुवात झाली. मात्र, मागील दहा वर्षांत मालवाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतानाही, रस्ता मात्र जैसे थे राहिला आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरलोड वाहतूक, रस्त्याची खराब अवस्था आणि अवजड वाहनांच्या चालकांचा अनियंत्रित वेग यामुळे या रस्त्यावर महिन्यातून किमान एका तरी निष्पाप नागरिकाचा बळी जात आहे. या मार्गावर अनेक शाळा-महाविद्यालये असल्याने पालकवर्गही प्रचंड चिंतेत आहे. अनेकदा मालवाहतूक करणारे बंद पडलेले ट्रक रस्त्यावर उभे राहिल्याने वाहतूक ठप्प होते, ज्यामुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या सर्व गंभीर बाबी समोर ठेवून, नागरिकांचा वाढता रोष आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून श्री. गावणकर यांनी आज उपविभागीय अधिकारी रत्नागिरी श्री जीवन देसाई साहेब यांच्या कार्यालयात नायब तहसीलदार सौ श्रुती सावंत मॅडम यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केले.
या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे.पुढील आठ दिवसांत जर योग्य ती कार्यवाही आणि ठोस उपाययोजना झाली नाही, तर या तालुक्यातील जनता आपल्या जगण्याच्या मूलभूत अधिकारासाठी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरेल. तसेच, जोपर्यंत यावर तोडगा निघत नाही, तोपर्यंत या रस्त्यावरून कोणतीही मालवाहतूक होऊ दिली जाणार नाही. दिवसाढवळ्या रस्त्यावर कीड्या-मुंग्यांसारखे चिरडून मारण्याइतके जीवन स्वस्त नाही, असे ठणकावून सांगत, या परिस्थितीला संबंधित प्रशासकीय विभागच जबाबदार राहतील, असा स्पष्ट इशारा श्री. प्रथमेश गोपाळ गावणकर यांनी दिला आहे.