संगमेश्वर/ मकरंद सुर्वे: संगमेश्वर तालुक्यातील नावडी बाजारपेठ परिसरात नुकत्याच रात्री उशिरा एक थरारक घटना घडली. एका धाडसी महिलेने आपल्या पाळीव मांजराचे प्राण वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी दोन हात केले आणि त्याला पळवून लावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ही घटना रात्री उशिरा घडली. नावडी बाजारपेठेतील रहिवासी सरिता यल्लपा शास्त्री यांच्या घराजवळ रात्रीच्या वेळी रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. याच अंधाराचा फायदा घेऊन अचानक एका बिबट्याने जवळच्या झाडीतून बाहेर येत त्यांच्या पाळीव मांजरीवर हल्ला चढवला. बिबट्या मांजरावर झडप घालणार, इतक्यात सरिता शास्त्री यांच्या हे लक्षात आले.
सरिता शास्त्री यांनी कोणताही विचार न करता, मोठ्या धैर्याने आरडाओरडा करत बिबट्याला पिटाळले. त्यांच्या या प्रसंगावधानामुळे बिबट्या घाबरून पळून गेला आणि त्यांच्या मांजरीचे प्राण वाचले. एका महिलेने दाखवलेल्या या धाडसामुळे त्यांचे परिसरात कौतुक होत आहे.
या घटनेमुळे नावडी बाजारपेठेत बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी लवकरात लवकर या ठिकाणी योग्य प्रकाशव्यवस्था करण्याची मागणी केली आहे. तसेच, महामार्गालगतची झाडीझुडपे छाटून रात्रीच्या वेळी लाईट बसवण्याची आवश्यकता असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. याबाबत वनविभाग आणि ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.