GRAMIN SEARCH BANNER

माजी विरोधी पक्षनेते दिलीप मुजावर यांचा शिवसेनेत प्रवेश; लांजा-राजापूरमध्ये विरोधकांचा ‘सुफडा साफ’ करण्याचे आमदार सामंतांचे रणशिंग!

Gramin Varta
10 Views

लांजा/ सिकंदर फरास : लांजा नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते, ज्येष्ठ नगरसेवक व पत्रकार दिलीप मुजावर यांनी आज (दि. १९ ऑक्टोबर २०२५) आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करत शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश केला. मुजावर यांच्यासह लांजा परिसरातील अनेक माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुण कार्यकर्त्यांनी यावेळी भगवा हाती घेतला, ज्यामुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

दिलीप मुजावर हे लांजा तालुक्यात पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले एक प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे लांजा परिसरातील शिवसेनेला मोठे बळ मिळाले असून संघटनात्मक ताकद वाढणार असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात मुजावर यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “मी नेहमीच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवला आहे. किरण सामंत यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा खरा विकास होईल, या विश्वासाने मी पुन्हा शिवसेनेच्या झेंड्याखाली आलो आहे.” पारंपरिक पद्धतीने ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत मुजावर यांनी आपल्या नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली.

यावेळी दिलीप मुजावर यांच्यासोबत मुस्ताक मुजावर, हुसेन मुजावर, अजीम मुजावर, फिरोज मुजावर, अल्लाउद्दीन मुजावर, अल्फाईझज पाटणकर, शहाबाज मुजावर, दानिश मुजावर, शहानवाज खान, सैफअली कासू, इजान नेवरेकर, रेहान नेवरेकर, उस्मान मालदार, राहील पटेल, दानिश पटेल, रज्जब सारंग, इम्तियाज पाटणकर, सलमान थोडगे, फरान नेवरेकर, हर्षद पाथरे, अल्पाइज सारंग, कादिर बोबडे, तोफिक बोबडे, शौकत बोबडे, सुफियान बोबडे, तवकीर बोबडे, मुबारक प्रभुलकर, संतोष लांजेकर, वृषाली लांजेकर, राकेश खानविलकर, चंद्रकांत रहाटे, अभिजीत रहाटे, लहू लांजेकर, संजय लांजेकर, विष्णू चव्हाण, गणपत शेलार, विपुल लांजेकर, सुनील सुर्वे, स्वरूपा कदम, राधा जाधव, राजू फकीर अशा अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विरोधकांचा सुफडा साफ करण्याचे आमदार सामंतांचे रणशिंग
आगामी नगरपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लांजा-राजापूर मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेक प्रभावी नेते आणि स्थानिक कार्यकर्ते थेट आमदार किरण सामंत यांच्या संपर्कात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर बोलताना आमदार किरण सामंत यांनी विरोधकांना थेट आव्हान दिले आहे.

“लांजा-राजापूर मतदारसंघातील जनतेने विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत फडकवू. विरोधकांचा सुफडा साफ करणे हेच आमचे लक्ष्य आहे,” असा निर्धार आमदार सामंत यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात विकासाच्या कामांना गती मिळत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांवर दिसून येणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. सामंतांच्या नेतृत्वाखालील या मोठ्या पक्षप्रवेशामुळे लांजा-राजापूर मतदारसंघातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

2671432
Share This Article