GRAMIN SEARCH BANNER

कुडाळ – वाहून गेलेल्या युवकाचा अजून शोध नाही; मोहीम थांबवली

नदी पात्रातील गाळाचा मुद्दा ऐरणीवर

कुडाळ: तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या.माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३,रा.माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा.च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले.

सुदैवाने सखाराम कानडे यांना झाडाचा आधार मिळाला व ते बाहेर आल्याने बचावले.या घटनेची माहिती मिळताच सोमवारी रात्रीच कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळी भेट दिली, बचावलेल्या सखाराम कानडेची विचारपुस केली. दरम्यान मंगळवारी सकाळी एनडीआरएफ पथकासह प्रशासनाने नागरीकांच्या सहकार्याने घटनास्थळी कर्ली नदि पात्रात शोधमोहीम सुरू केली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा थांगपत्ता न लागल्याने शोधमोहीम आटोपती घेतली. नदीपात्रात गाळ साठल्याने थोडा पाऊस पडला तरी पुलावर पाणी येते. आणि अशा दुर्घटना घडतात. यापूर्वी सुद्धा काहीजणांना आपले प्राण गमवावे लागल्याने या ठिकाणच्या गाळाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

कुडाळ तालुक्यातील माणगांव डोबेवाडी येथील सखाराम कानडे हे आपल्या कामानिमित्त वसोली सतयेवाडी येथे सोमवारी रात्री जाणार होते, त्यांना गाडी चालवता येत नसल्याने त्यांनी आपल्या नात्यातील अमित धुरी याला सोबत घेऊन सायंकाळी उशिरा ७:३० वा.च्या सुमारास माणगांव येथून वसोली सतयेवाडीकडे जाण्यासाठी निघाले; त्यावेळी पाऊस सुरू होता. त्यांची मोटरसायकल वसोली सतयेवाडी काॅजवेजवळ आली असता कॉजवेवर पाणी असल्यामुळे गाडी जाणार नाही, असे सखाराम कानडे यांनी अमित धुरी याला सांगितले मात्र पाणी कमी आहे आपली गाडी जाऊ शकते असे अमित याने सखाराम कानडे यांना सांगितले व आपल्या ताब्यातील गाडी काॅजवेवरील पाण्यातून अमितने घातली, मात्र काॅजवेवर पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे अमितचा गाडीवरील ताबा सुटला आणि दोघेही गाडीसह काॅजवेवरच पडले.अमितचा गाडीचा हात सुटल्याने तो कॉजवे खाली गेला. त्या पाठोपाठ सखाराम कानडे काॅजवे वरील पाण्यात पडले.सुदैवाने सखाराम कानडेच्या हाताला नदीपात्रातील झाड लागल्याने तो आधार पकडून ते काठावर आले.तर अमित वाहुन गेल्याचे त्यांनी स्वतः सांगितले.

या घटनेनंतर सखाराम कानडे यांची घाबरगुंडी उडाली.अखेर कानडे यांनी रात्रीचा वेळ असल्यामुळे आहे त्या परिस्थितीत तिथूनच एक किलोमीटरवर अंतरावर असलेल्या आपल्या नात्यातील खोचरे नामक कुटुंबाकडे धाव घेतली व झाला प्रकार सांगितला.त्यानंतर सर्वत्र फोना-फोनी सुरू झाली.या घटनेची माहिती कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे व कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी सोमवारी रात्रीच धाव घेतली व घटनास्थळी आजुबाजुला बॅटरीच्या सहाय्याने ग्रामस्थांच्या उपस्थितीत शोधाशोध केली मात्र रात्रीचा अंधार व पुन्हा पावसाच्या सरी यामुळे शोधकार्यात मर्यादा आल्या. यावेळी पोलिसांच्या उपस्थित काॅजवेवर पाण्यात पडलेली मोटरसायकल नागरिकांनी बाहेर काढून ठेवली.

यावेळी वसोली सरपंच अजित परब, निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव.शिवापुर ग्राम महसूल अधिकारी सुरज भांदिगरे,वसोली ग्रामसेवक अनिल कदम,ग्राम महसूल अधिकार ग्रामपंचायत वसोली ओंकार मणचेकर,योगेश धुरी आदिंसह ग्रामस्थ व नागरीक हजर होते. यावेळी बचावलेल्या रामचंद्र कानडे यांची त्यांच्या मामाच्या घरी जाऊन विचारपूस केली व घटनाक्रम दोन्ही अधिकाऱ्यांनी जाणून घेतला.यावेळी पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम व तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी चर्चा करून मंगळवारी सकाळपासून शोधमोहीम सुरू करण्याचे नियोजन केले तशा आपल्या यंत्रणेला सुचेना दिल्या.

सकाळीच शोधमोहीम केली सुरू

वसोली कुत्रेकोंड येथे सोमवारी रात्री माणगाव येथील युवक अमित धुरी वाहुन गेला, त्याचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथकाचे २२ जणांचे पथक तसेच या भागातील सरपंच अजित परब, मंडळ अधिकारी रजनी ढवळ,अनिल राणे तलाठी सुरज भांदिगरे,ग्रामसेवक अतुल कदम,पोलीस पाटील,कोतवाल यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत प्रशासनाने शोध मोहीम हाती घेतली.नदिपात्राच्या दुतर्फा तीरावर एनडीआरएफच्या पथकाने व नागरिकांनी अमितचा शोध घेतला मात्र सायंकाळी उशिरापर्यंत अमितचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली.

त्या काॅजवेचा दुसरा बळी ?

वसोली सतयेवाडी येथील काॅजवे सखल व काहीसा लांब आहे तसेच त्या कॉजवेला गार्ड स्टोन सुध्दा नाहीत.त्या काॅजवेतील पात्रात गाळ साचल्याने पाऊस जरा वाढला तरी लगेचच काॅजवेवर पाणी येते.त्यामुळे वाहतुकीची ये-जा बंद होते.या काॅजवेच्या बाजूला लोखंडी साकव आहे मात्र त्यावरून कसरत करत मोटरसायकल न्यावी लागते म्हणून अनेकजण काॅजवेवरुनच जाण्याची रिस्क घेतात.अशाच पध्दतीने ये-जा करताना यापुर्वी पावसाळी मौसमात चार-पाच अप्रिय घटना घडल्या आहेत. त्यात गणेश कुंभार नामक युवकाचा वाहुन मृत्यू झाला तर इतर तीन-चार घटनांमध्ये मोटरसायकल स्वार सुदैवाने बचावले.या सर्व घटनांची चर्चा अमितच्या वाहून जाण्याने चर्चिल्या गेल्या.

Total Visitor

0217871
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *