फरार कार चालकाला अखेर अटक
खेड : मुंबई-गोवा महामार्गावर खेडजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारने पायी चालणाऱ्या दोन व्यक्तींना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी खेड पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना ३० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास लोटे एमआयडीसीमधील रिव्हरसाईड कॉलनी येथील सीईटीपी टाकीसमोर घडली. मयत चंद्रशेखर जकंद सरोज (वय ५६) आणि जखमी सुनील कुमार कश्यप (वय ३५) हे दोघे महामार्गाच्या कडेने पायी चालत जात होते.
त्याचवेळी, मुंबई-गोवा महामार्गावरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक MH-03/BS-6181) वरील चालक तेजस सदानंद तावडे (वय ४२, रा. भांडुप, मुंबई) याचे वाहनावरील नियंत्रण सुटले.
अतिशय निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे कार चालवत असलेल्या तावडेने पायी चालणाऱ्या या दोघांना मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात चंद्रशेखर सरोज यांचा जागीच मृत्यू झाला, तर सुनील कुमार कश्यप गंभीर जखमी झाले. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुनील कुमार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताबाबत जगत पाल सत्यनारायण (वय २०, रा. रिव्हरसाईड कॉलनी, लोटे) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी आरोपी तेजस तावडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे महामार्गावरील पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
खेडजवळ भरधाव कारने पादचाऱ्यांना चिरडले; एकाचा जागीच मृत्यू, दुसरा गंभीर जखमी





