रत्नागिरी: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या राम आळी आणि मारुती आळीमधील रस्त्याच्या प्रस्तावित सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे सुरू झालेले काम तात्काळ थांबवावे, या मागणीसाठी स्थानिक रहिवासी आणि व्यापारी वर्गाने बुधवारी रत्नागिरी नगर परिषदेवर (न.प.) धडक दिली. रस्त्याच्या विकासाला आपला कोणताही विरोध नसतानाही, तोंडावर आलेल्या दिवाळी आणि एकादशी या महत्त्वाच्या सणांच्या काळात कॉंक्रीटीकरण सुरू करू नये, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. यासंदर्भात ८ ऑक्टोबर रोजी व्यापारी व रहिवाशांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
निवेदनात त्यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत आणि लवकरच दिवाळी तसेच एकादशीचा मोठा बाजार भरेल. या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. जर याचवेळी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण सुरू झाले, तर दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागेल. त्यामुळे हे काम दिवाळी आणि एकादशीचा सण होईपर्यंत पुढे ढकलण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
बाजारपेठेत होणारी गर्दी आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी, नवीन कॉंक्रीटीकरण होईपर्यंत सध्या खराब झालेल्या रस्त्याची तात्पुरती डागडुजी करावी, असेही रहिवाशांनी सुचवले आहे. त्यासोबतच, सिमेंट कॉंक्रीटीकरण करताना रस्त्याची रुंदी, ड्रेनेज लाईन आणि इतर तांत्रिक बाबींबाबत स्थानिक रहिवासी व व्यापारी यांच्याशी चर्चा करूनच अंतिम आराखडा तयार करावा, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात रस्त्याचे स्वरूप कसे असावे, यासंबंधी माहितीपत्रक व नागरिकांच्या सह्यांचे पत्रकही त्यांनी निवेदनासोबत जोडले आहे.
रहिवासी व व्यापाऱ्यांच्या सूचनांचा विचार न करता किंवा सणांच्या काळात काम सुरू केल्यास या कामाला आपला कायम विरोध राहील, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी नगर परिषदेकडे मांडली आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांसोबत तातडीने एक बैठक आयोजित करण्याची विनंती मुख्याधिकाऱ्यांना केली आहे. बैठकीत स्थानिक लोकप्रतिनिधी, नगर परिषद अधिकारी व मारुती आळीतील प्रतिनिधी उपस्थित राहिल्यास समस्येवर त्वरित मार्ग निघू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.