GRAMIN SEARCH BANNER

सावंतवाडी : कात कारखान्यावर 11.65 लाखांची मोठी कारवाई, मात्र आरोपीवर गुन्हा नाही; वन विभागाच्या कारवाईवर संशय

Gramin Varta
149 Views

सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे-मिरीस्तेवाडी येथे १५ सप्टेंबर रोजी सावंतवाडी वन विभागाने कात कारखान्यावर मोठी धाड टाकून तब्बल ११.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र एवढ्या मोठ्या कारवाईनंतरही आरोपीवर गुन्हा दाखल न झाल्याने विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे 6 महिन्यापूर्वी ही याच ठिकाणी कारवाई केली होती. मात्र तेव्हाही काहीच पुढे आले नाही.

वनक्षेत्रपाल सावंतवाडी आणि वनपाल श्री. पांचाळ यांच्या पथकाने एन. जे. ऍग्रो प्रॉडक्ट येथे पाहणी केली असता विनापरवाना खैर किटा, चिप्पर मशीनच्या सहाय्याने तयार केलेले खैर चिप्स, काथ द्रव्य व काथवडी आढळून आले. हे सर्व पंचनामा करून जप्त करण्यात आले.

आरोपी उद्योजक नारायण जाधव यांचे नाव स्पष्टपणे समोर येत असून, वन नियमांनुसार २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता जप्त झाल्यास न्यायालयात गुन्हा नोंद करणे बंधनकारक आहे. तरीदेखील विभागाने केवळ कागदोपत्री प्रक्रिया करूनच आरोपीला सोडले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.

यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा निर्णय व कारवाईवर गंभीर संशय व्यक्त होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्ती होऊनही आरोपीला अटक न होणे हे आर्थिक साटेलोटे किंवा दबावामुळे झाले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
स्थानिकांचा आरोप आहे की, “विभाग आणि आरोपी यांच्यात काहीतरी व्यवहार झाले असावेत,” त्यामुळेच न्यायालयीन गुन्हा नोंदविण्यात आला नाही.

या प्रकरणाची सखोल व स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे, अन्यथा अशा कारवाया फक्त दिखाव्यासाठीच होत असल्याची जनतेची भावना अधिक बळकट होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Total Visitor Counter

3366978
Share This Article