GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : तोणदे येथील आंबा व्यावसायिक रूपेश नागवेकर यांच्या आत्महत्येचा कॉल डेटाची सखोल छाननी सुरू

रत्नागिरी: तालुक्यातील तोणदे येथील प्रसिद्ध आंबा व्यावसायिक रूपेश उर्फ बाळ्या नागवेकर यांच्या गूढ आत्महत्येचे रहस्य उकलण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. नागवेकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत जीवन संपवण्यामागे नेमके कोणते कारण दडलेले आहे, याचा शोध घेण्यासाठी पोलीस गेल्या दोन महिन्यांतील कॉल डेटा रेकॉर्डची कसून तपासणी करत असून संशयास्पद व्यक्तींचे जबाब नोंदवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही दिवसांपूर्वी तोणदे येथील आपल्या निवासस्थानी नागवेकर यांनी स्वतःच्या शेती संरक्षण परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली होती, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

सुरुवातीला या आत्महत्येमागे आजारपण किंवा कर्ज व्यवहार असू शकतात अशी चर्चा होती, मात्र पोलिसांनी सर्व शक्यता डोळ्यासमोर ठेवून तपास सुरू केला आहे. मागील दीड-दोन महिन्यांत नागवेकर यांना आलेल्या आणि त्यांनी केलेल्या सर्व कॉलची माहिती पोलीस गोळा करत आहेत. ज्या व्यक्तींनी त्यांना अनेक वेळा फोन केले होते, त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे सविस्तर जबाब घेतले जात आहेत. विशेषतः नागवेकर यांनी सावकारी पाशाला कंटाळून किंवा कुणाच्या सततच्या त्रासाला वैतागून हे टोकाचे पाऊल उचलले का? या दिशेनेही पोलिसांनी तपासाचा मोर्चा वळवला आहे. या प्रकरणात घरातील व्यक्तींचे जबाबही लवकरच नोंदवले जाणार असून, त्यातून तपासाच्या दृष्टीने आणखी काही महत्त्वाची माहिती हाती येण्याची शक्यता आहे.

या धक्कादायक घटनेने तोणदे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, ग्रामीण पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. सध्या पोलीस यंत्रणा तांत्रिक पुराव्यांच्या आधारे घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत असून, लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल अशी चिन्हे दिसत आहेत

Total Visitor Counter

3487279
Share This Article