GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: जेलनाका येथे एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

Gramin Search
18 Views

रत्नागिरी: शहराच्या मध्यभागी असलेल्या जेलनाका परिसरात गुरुवारी रात्री  साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश रमेश कदम (२८, रा. मारुती मंदिर, रत्नागिरी) हे आपली दुचाकी (एमएच ०८ एलवाय १५२४) घेऊन आठवडा बाजार येथून मारुती मंदिराच्या दिशेने जात होते. त्याचवेळी, एमएच १४ एलएक्स ७१३६ क्रमांकाची एसटी बसही याच मार्गावर प्रवास करत होती. जेलनाका येथे दोन्ही वाहने एकाच वेळी आली असता, एसटी बसच्या डाव्या बाजूने दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेमुळे दुचाकीवरील सिद्धेश कदम आणि त्यांच्यासोबत असलेली महिला हर्षदा मोहिते हे दोघेही खाली पडून जखमी झाले. अपघातानंतर तात्काळ स्थानिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. दोघांनाही तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातामुळे जेलनाका परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघाताची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3109065
Share This Article