GRAMIN SEARCH BANNER

खेड: उत्तरकार्याच्या दिवशीच मिळणार मृत्यू दाखला; देवघर-सोंडे ग्रामपंचायतीचा संवेदनशील निर्णय

Gramin Varta
85 Views

खेड : घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांना मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार खेटे मारावे लागतात, मात्र खेड तालुक्यातील देवघर-सोंडे ग्रामपंचायतीने यावर तोडगा काढत एक संवेदनशील आणि अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मृत व्यक्तीचा मृत्यू दाखला त्यांच्या उत्तरकार्याच्या दिवशीच कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार असून, या निर्णयाचे ग्रामस्थांमधून मोठे समाधान व्यक्त केले जात आहे.

देवघर-सोंडे ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बळावर कोकण विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. शासनाच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोचवून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडून नेहमीच आटोकाट प्रयत्न केले जातात. याशिवाय शासकीय उपक्रमांतर्गत ग्रामस्थांमध्ये व्यापक स्तरावर जनजागृती करत त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा प्रयत्न प्रशासन करत असते. आजवर ग्रामपंचायतीने राबवलेल्या सर्व उपक्रमांना ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रत्येक अभियान यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर सरपंच सुनील मोरे, उपसरपंच रवींद्र इंगळे आणि ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन आदर्श पायंडा पाडण्यात आला आहे.

मृताच्या उत्तरकार्याच्या दिवशी म्हणजेच बाराव्या दिवशी मृत्यूचा दाखला थेट घरी पोहोच केल्यामुळे संबंधित कुटुंबातील सदस्यांना वेळेत दाखला उपलब्ध होणार आहे, परिणामी त्या दाखल्याचा उपयोग विविध शासकीय आणि कायदेशीर कामांसाठी करणे तत्काळ शक्य होणार आहे. या उपक्रमाची सुरुवात करताना देवघर येथील संदीप वासुदेव मोरे यांच्या उत्तरकार्याच्या दिवशी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे सरपंच सुनील मोरे यांच्या हस्ते हा दाखला सुपूर्द करण्यात आला.

दुःखाच्या प्रसंगी प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांचा त्रास वाचणार आहे. या पहिल्या दाखला वाटपाच्या प्रसंगी उपसरपंच रवींद्र इंगळे, माजी उपसभापती रवींद्र मोरे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. प्रशासकीय काम आणि सामाजिक बांधिलकी यांचा हा उत्तम मेळ असल्याचे बोलले जात आहे.

Total Visitor Counter

3199350
Share This Article