पुणे: नीट यूजी २०२६ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असताना, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. लातूर येथील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई रविवारी (१७ मे २०२६) सायंकाळी करण्यात आली.
सीबीआयच्या माहितीनुसार, मोटेगावकर हे पेपर लीक करणाऱ्या एका संघटित रॅकेटशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तपासात असे समोर आले आहे की २३ एप्रिल २०२६ रोजी, परीक्षेपूर्वीच त्यांना नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका व उत्तरे मिळाल्याचा दावा करण्यात येतो.
१४ मे रोजी लातूर येथील त्यांच्या निवासस्थानी करण्यात आलेल्या झडतीदरम्यान त्यांच्या मोबाईलमध्ये लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित पुरावे आढळल्याचे तपास यंत्रणांनी सांगितले आहे. ही प्रश्नपत्रिका त्यांनी काही व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना पुरवल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.
तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने संबंधित माहिती व कागदपत्रे हटवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रश्नपत्र देण्यात आले, त्यांची नावे उघड करण्यास त्यांनी टाळाटाळ केल्याची माहितीही समोर आली आहे.
मोटेगावकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तसेच सार्वजनिक परीक्षा (अनुचित प्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कट रचणे आणि परीक्षेत गैरप्रकार घडवून आणणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत.
या अटकेनंतर लातूरसह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा विस्तार किती खोलवर आहे आणि यात आणखी कोण कोण सहभागी असू शकतो, याचा सखोल तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सुरू आहे.
तपास यंत्रणांच्या मते, या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असून, त्याचे धागेदोरे शोधण्यासाठी पुढील चौकशी सुरू आहे.
NEET पेपरफुटी प्रकरण : मोटेगावकरांवर गंभीर कायद्यांखाली गुन्हे दाखल






