चिपळूणमध्ये अत्याधुनिक ‘डायग्नोटेड सीबीसीटी सेंटर’ सुरू
चिपळूण / प्रतिनिधी : कोकणातील दंतवैद्यकीय आणि मुखरोग निदान क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची नवी भर घालत डॉ. सानिका राजेश वाजे यांनी चिपळूण येथे अत्याधुनिक ‘डायग्नोटेड सीबीसीटी सेंटर’ सुरू केले आहे. मुख, जबडा आणि चेहऱ्याशी संबंधित आजारांचे अचूक आणि प्राथमिक टप्प्यावर निदान करणारी ही सुविधा आता चिपळूणमध्ये उपलब्ध झाली असून, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी ही महत्त्वाची वैद्यकीय सेवा मानली जात आहे. विशेष म्हणजे, रत्नागिरी ते पनवेल दरम्यान ‘ओरल अँड मॅक्सोफेशियल रेडिओलॉजिस्ट’ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सानिका वाजे या एकमेव तज्ज्ञ ठरल्या असून, कोकणातील पहिल्या तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
डॉ. सानिका वाजे यांचे प्राथमिक शिक्षण चिपळूण येथील गद्रे हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी डीबीजे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे कोल्हापूर येथील तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेजमधून बीडीएस पदवी संपादन केली. दंतवैद्यकीय क्षेत्रात अधिक प्रगत शिक्षण घेण्याच्या उद्देशाने त्यांनी पुण्यातील सिंहगड डेंटल कॉलेजमधून डेंटल सर्जरी विषयात मास्टर्स केले. मुंबईतील सीबीसीटी सेंटरमध्ये त्यांनी व्यावसायिक अनुभव घेतला.
२०२५ मध्ये त्यांनी ‘ओरल मेडिसिन अँड रेडिओलॉजी’ या विषयात मास्टर्स पूर्ण केले. तोंडातील कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान, तोंडातील जखमा, गाठी, गुटखा आणि तंबाखू सेवनामुळे होणारे आजार, फंगल इन्फेक्शन तसेच इतर मुखरोगांवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. मुखातील कोणताही विकार गंभीर स्वरूप धारण करण्यापूर्वी त्याचे निदान होणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात.
मास्टर्सनंतर त्यांनी देशातील नामांकित टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. शिक्षण घेत असताना लखनऊ येथे झालेल्या असोसिएशन परिषदेत त्यांनी ‘नॉन-थर्मल प्लाझ्माद्वारे कर्करोग उपचार’ या विषयावर केस प्रेझेंटेशन सादर केले होते. त्यांच्या या संशोधनाला पुरस्कारही मिळाला होता. या तंत्रज्ञानामुळे तोंडाच्या कर्करोगाचे अगदी सुरुवातीच्या अवस्थेत निदान होऊन रुग्णांना तातडीने उपचार मिळू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करताना सीबीसीटी (Cone Beam Computed Tomography) मशीनवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या महानगरांमध्ये उपलब्ध असलेली ही सुविधा आता चिपळूणमध्ये उपलब्ध झाली आहे. हे थ्री-डी एक्स-रे स्कॅन तंत्रज्ञान असून, यामध्ये दात, जबडा आणि संपूर्ण चेहऱ्याचे अत्यंत अचूक स्कॅनिंग करता येते. सामान्य एक्स-रेमध्ये दोन-आयामी चित्र मिळते; मात्र, सीबीसीटीमध्ये थ्री-डी प्रतिमा उपलब्ध होत असल्याने निदान अधिक अचूक होते.
दंत इम्प्लांटचे नियोजन, रूट कॅनल उपचार, अडकलेल्या अक्कलदाढीची तपासणी, जबड्याच्या सांध्याची झीज, चेहऱ्याच्या हाडांची स्थिती, सायनसचे विकार, चेहऱ्यावरील फ्रॅक्चर तसेच कर्करोग कुठपर्यंत पसरला आहे, याचे निदान या तंत्रज्ञानामुळे सहज शक्य होत आहे. जबड्याच्या नसांचा शोध, चेहऱ्याची वाढ, तारांच्या उपचारांचे नियोजन तसेच जटिल दंत शस्त्रक्रियांसाठीही ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. कमी रेडिएशनमध्ये अचूक निदान हे या तंत्रज्ञानाचे मोठे वैशिष्ट्य मानले जाते.
चिपळूण शहरातील विजय मेडिकलच्या वरती सुरू करण्यात आलेल्या ‘डायग्नोटेड सीबीसीटी सेंटर’चा शुभारंभ माजी आमदार रमेशभाई कदम यांच्या हस्ते झाला. यावेळी ज्येष्ठ दंतवैद्य डॉ. जयंत महेंदळे, सामाजिक कार्यकर्ते विजयशेठ माटे, राष्ट्रवादीचे नेते जयंद्रथ खताते, राजेश वाजे, संजय वाजे, डॉ. अभिजीत सावंत, डॉ. मंगेश वाजे, डॉ. मीनल थत्ते आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांनीही डॉ. सानिका वाजे यांना शुभेच्छा दिल्या.
डॉ. सानिका वाजे यांचे वडील राजेश वाजे हे सामाजिक कार्यकर्ते आणि बांधकाम व्यवसायिक असून, क्रेडाई संस्थेमध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. तर डॉ. मंगेश वाजे हे सीजीपीएचे माजी अध्यक्ष आहेत.
वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक आणि वेगळ्या शाखेत पाऊल टाकत डॉ. सानिका वाजे यांनी कोकणासाठी नवी सुविधा उपलब्ध करून दिली असून, त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.







