कोल्हापूर: मराठी भाषा, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण ठरलेल्या एका महत्त्वपूर्ण उपक्रमाची नोंद कान्स चित्रपट महोत्सवात झाली आहे. महाराष्ट्रातील पहिले मराठी भाषेला समर्पित डिजिटल मनोरंजन व्यासपीठ ‘अभिजात मराठी ओटीटी’चा जागतिक शुभारंभ कान्स फिल्म फेस्टीव्हल मधील ‘इंडिया पॅव्हेलियन’मध्ये दिमाखात पार पडला.
मराठी आशयाला जागतिक स्तरावर नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममुळे मराठी चित्रपट, साहित्य, संस्कृती आणि नव्या पिढीतील सर्जनशील कथाकथनाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि जागतिक दर्जाचे कंटेंट वितरण यांचा संगम साधत या उपक्रमाने मराठी मनोरंजन क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या सोहळ्यात ‘अभिजात मराठी एआय’चे विशेष सादरीकरण करण्यात आले. मराठी आशय अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे, बहुभाषिक उपलब्धता वाढवणे आणि प्रेक्षकांचा अनुभव अधिक सुलभ व स्मार्ट बनवणे, हे या AI उपक्रमाचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमात ‘अभिजात मराठी’चे झी-इनंटरटेन्मेंट इंटरप्राईसेस आणि लामिनार-एआय यांच्यासोबतचे धोरणात्मक करारही जाहीर करण्यात आले. कंटेंट पार्टनरशिप, AI-आधारित अनुभव आणि डिजिटल विस्तारासाठी हे करार महत्त्वाचे मानले जात आहेत.
या जागतिक लाँचला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, अभिनेत्री प्राजक्ता माळी , तसेच केदार जोशी, अंकिता वाळवळकर आणि जयंती वाघधरे यांनी या सोहळ्यात सहभाग नोंदवला. रेड कार्पेटवर ‘अभिजात मराठी’चे प्रतिनिधित्व अशोक सराफ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या प्रसंगी आयोजित पॅनेल चर्चेत प्रादेशिक भाषांतील कंटेंटची वाढती जागतिक मागणी, ओटीटी युगातील कथाकथनाची ताकद आणि भारतीय मनोरंजन क्षेत्रातील नव्या संधींवर सखोल चर्चा झाली.
‘अभिजात मराठी’च्या संकल्पनेला 2024 मध्ये भारत सरकारने मराठी भाषेला दिलेल्या ‘अभिजात भाषे’च्या दर्जानंतर अधिक बळ मिळाल्याचे सांगण्यात आले. तसेच राज्यातील विविध नेते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरल्याचेही अधोरेखित करण्यात आले.
मराठी भाषा, सिनेमा आणि डिजिटल कथाकथनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारा हा उपक्रम मराठी मनोरंजनसृष्टीसाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.





