GRAMIN SEARCH BANNER

खेड : परशुराम घाटात मच्छीवाहू ट्रक उलटला; चालक गाडीखाली अडकलेला असताना त्याला काढण्याऐवजी लोकांनी मच्छी नेली उचलून!

Gramin Varta
1.5k Views

खेड : मुंबई–गोवा महामार्गावरील परशुराम घाटात सोमवारी सकाळी घडलेल्या एका अपघाताने मानवी संवेदनांचा भयंकर तुटवडा किती वाढलाय याचं जिवंत उदाहरण समोर आणलं. मच्छी घेऊन जाणारा एक ट्रक सकाळी अंदाजे आठच्या सुमारास रस्त्याच्या कडेला उलटला, आणि यात चालक गंभीर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकलेला होता. मदतीला धावून जाण्याऐवजी अनेकांनी मात्र ट्रकमधून बाहेर पडलेली मच्छी लुटून नेण्याचा प्रकार केला.

अपघातात जखमी झालेल्या चालकाचं नाव मोहम्मद अशफाक पी (वय 42, केरळ) असं आहे. कुलाब्यातून केरळकडे जाणारा हा मच्छीवाहू ट्रक परशुराम घाट चढत असताना वाहनाचे नियंत्रण सुटल्याने तो कडेला पलटी झाला. धाडक्याचा आवाज होताच परिसरातील वाहनं थांबली, गर्दीही जमली, पण मदत करण्यापेक्षा हातात थेट मच्छी घेऊन धावणारे लोक जास्त दिसत होते.

चालक आतमध्ये अडकून वेदनेने आरडाओरडा करत असताना बाहेरच्या नागरिकांनी पापलेट, बांगडा, सुरमई अशा ५ ते १० किलो वजनाच्या मच्छीच्या पेट्या हिसकावून नेण्याची स्पर्धाच लावली. काहींनी दोन हातात भराभर पिशव्या भरल्या, तर काहींनी थेट वाहनात टाकून पसार झाले. हा संपूर्ण प्रकार काही क्षणांत व्हिडिओसुद्धा काढला गेला.

या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून चालकाला नंतर स्थानिकांनी आणि पोलिसांनी बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र, या घटनेत सर्वाधिक खटकणारी बाब म्हणजे जखमी माणसापेक्षा मच्छीला अधिक महत्त्व देणारा निर्ढावलेपणा दिसून आला. परशुराम घाटातील या घटनाक्रमामुळे “मानवीपणा नेमका कुठे हरवला?” असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Total Visitor Counter

3073151
Share This Article