GRAMIN SEARCH BANNER

मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना ३५ लाख घरे उपलब्ध करणार – उपमुख्यमंत्री शिंदे

Gramin Varta
7 Views

मुंबई: बाहेर गेलेल्या मराठी माणसांना ३५ लाख घरे उपलब्ध करणार, असा निर्धार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

तसेच काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशाराही त्यांनी उबाठा गटाला दिला.

उबाठाच्या नेत्यांनी शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. या आरोपांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आज कडक शब्दांत समाचार घेतला.

गोरेगाव मधील नेस्को येथे “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. यावेळी शिवसेना नेते गजानन कीर्तिकर, नेते रामदास कदम, खासदार रवींद्र वायकर, प्रवक्ते संजय निरुपम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले की, रामदास कदम मला माहित आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करु नका. निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. निवडणुका येतात आणि जातात पण त्यांनी लक्षात ठेवावे, ज्यांचं घर काचेचं असतं, त्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा त्यांनी यावेळी आरोप करणाऱ्यांना दिला. त्यांच्या पोटात दुखते कारण त्यांनी इतकी वर्ष मराठी माणसांसाठी काही केलं नाही. आपल्या सरकारने मुंबईतील रस्ते काँक्रिटचे केले आहेत. येत्या अडीच वर्षांत संपूर्ण मुंबईचे रस्ते काँक्रिटचे होतील. रस्त्यांचे रिपेअरिंग होणार नाही, त्यामुळे त्यांचा पैसा बंद होईल अशी टीका त्यांनी उबाठावर केली. मराठी माणसासाठी त्यांनी काहीच केलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मराठी माणसाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी काम सुरू आहे. जे मराठी लोक मुंबईबाहेर गेले, त्यांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण प्रत्येकाच्या हातात तो देण्याची माझी इच्छा आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सिद्धेश कदम, योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या कामाचं कौतुक करताना सांगितले की, येथे उपस्थित नेते हे शाखाप्रमुख राहिले आहेत. शाखा हे न्यायाचे मंदिर आहे. शिवसैनिक वर्षानुवर्षे तिथे जनतेसाठी काम करत आले आहेत. लोकांचा विश्वास आहे की, आपल्याला तिथे न्याय मिळतो. मी देखील जनतेच्या सेवा कार्यातून आणि शाखेतील कामगिरीमधूनच मुख्यमंत्री झालो आणि सत्तेतील माझ्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. आजही तीच दिशा पुढे नेण्याचे काम चालू आहे. आपण अनेक योजना सुरू केल्या. यात लाडकी बहिण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी योजना – या सर्व योजनांचा लाभ लोकांना होत आहे. लाडकी बहिण योजनेमुळे अडीच कोटी बहिणींना फायदा झाला असून मी त्यांचा लाडका भाऊ झालो आहे. जिथे जिथे जातो तिथे त्यांच्या प्रेमाचा मान मला मिळतो. लाडकी बहिण योजनेचा अनेकांनी विरोध केला होता, पण आम्ही ती सुरू केली आणि त्याचा थेट फायदा आमच्या बहिणींना झाला. ही योजना एक गेम चेंजर ठरली आणि त्यामुळंच आम्हाला ऐतिहासिक विजय मिळाला असे ते म्हणाले.

शासन आपल्या दारी उपक्रमातून राज्यातील पाच कोटी नागरिकांना थेट लाभ मिळाला असे प्रतिपादन केले. या शिबिरात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आली. या शिबिराचा मुख्य उद्देश हा शासकीय सेवा आणि योजना नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवणे, जेणेकरून नागरिकांना वेळेवर योजनांचा लाभ घेता येईल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की , पूर्वी नागरिकांना कामासाठी सरकारी कार्यालयात अनेक फेरे मारावे लागत होते, तरीसुद्धा त्यांचे काम होत नव्हते. त्यामुळे ते शासकीय योजनांचा लाभ घेऊ शकत नव्हते. पण आता सरकार थेट त्यांच्या दारी पोहोचत असल्यामुळे लोकांना मोठा फायदा होत आहे. आजपर्यंत सुमारे ५ कोटी नागरिक या उपक्रमाचे लाभार्थी झाले आहेत आणि ही संख्या अजून वाढणार आहे. कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले की विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा कार्यक्रमांमुळे त्यांना प्रेरणा मिळते आणि शासकीय योजनांच्या माध्यमातून आपले भविष्य घडवण्याची संधी मिळते असे ते म्हणाले.

Total Visitor Counter

2647122
Share This Article