ट्रिपल सीट दुचाकीस्वारावर गुन्हा
रत्नागिरी : निवळी-गणपतीपुळे रस्त्यावर जाकादेवी बाजारपेठेत बुधवारी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. तिघांना घेऊन वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने पादचाऱ्याला धडक दिल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. ओरी, बौद्धवाडी, ता.जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १९ जून रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात निवळी ते गणपतीपुळे जाणाऱ्या रोडवर जाकादेवी बाजारपेठेतील श्री. काणे यांच्या ‘स्वरूप हार्डवेअर’ दुकानातून बाहेर पडताना घडला. या अपघातात रघुनाथ पांडुरंग खापले हे पादचारी गंभीर जखमी झाले आहेत.
फिर्यादी विष्णू हरी घाणेकर (वय ४०, चंदा रिक्षा चालक, रा. देवूड, लावगणवाडी, ता.जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल राजेंद्र जाधव (वय १९, रा. ओरी, बौद्धवाडी, रत्नागिरी) हा त्याच्या ताब्यातील (एम.एच.०८/बी.एच/४८४७) या क्रमांकाच्या मोटारसायकलवर रोशन विनोद मोहिते (रा. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि जिया जितेंद्र मोहिते (रा. वरवडे, ता.जि. रत्नागिरी) यांना ट्रिपल सीट बसवून जाकादेवी बाजारपेठेतून गणपतीपुळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता.
मोटारसायकल चालवताना आरोपी कुणाल जाधवने रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता, अतिवेगाने गाडी चालवून ती रस्त्याच्या उजव्या बाजूला नेली. याचवेळी रस्त्यावर असलेल्या पादचारी रघुनाथ पांडुरंग खापले यांना त्याने धडक दिली. या अपघातात खापले यांच्या डोक्याला आणि डाव्या कानाला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या डाव्या हाताला, पायाला आणि गालाला किरकोळ दुखापती झाल्या आहेत.
अपघात घडल्यानंतर तात्काळ ग्रामीण पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली. बुधवार, १९ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजता कुणाल जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जाकादेवी येथे दुचाकीस्वाराची पादचाऱ्याला धडक, वृद्ध गंभीर

Leave a Comment