GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : लोटे एमआयडीसीत पाईपलाईन फुटली, भरवस्तीत पाण्याचा जोरदार फवारा; परिसरात गोंधळ

Gramin Varta
164 Views

चिपळूण : चिपळूण–वालोपे येथून खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत व परिसराला पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य पाईपलाईन शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फुटली. भरवस्तीतून गेलेल्या पाईपलाईनचा मॅनहोल कव्हर निसटल्याने प्रचंड दाबाने पाण्याचा फवारा उडाला आणि पाणी शेजारील मंगल कार्यालय व सिमेंट फॅक्टरीत शिरले.

वालोपे येथील वाशिष्ठी नदीवरील एमआयडीसी पंपहाऊसमधून लोटे औद्योगिक वसाहतीसह आसपासच्या अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. वालोपे ते लोटे जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत सुमारे ६ किलोमीटर लांबीची व ७०० मिमी व्यासाची ही पाईपलाईन आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात फरशी तिठा येथे पाईपलाईन फुटून दुकानदारांचे नुकसान झाले होते. शनिवारी पुन्हा अशाच प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी एमआयडीसीशी संपर्क साधला. माजी सरपंच प्रवीण पाकळे यांनी उपअभियंता पिंपळे यांना कळवताच तत्काळ पाणीपुरवठा बंद करण्यात आला आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मॅनहोल कव्हर निसटल्याने दुरुस्ती लवकर पूर्ण होईल तसेच साठवणुकीमुळे लोटे परिसरातील पाणीपुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नसल्याचे एमआयडीसीकडून सांगण्यात आले.
दरम्यान, पाईपलाईनच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वस्ती वाढल्याने अशा घटनांचा धोका वाढत असल्याने एमआयडीसीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी सरपंच प्रवीण पाकळे यांनी केली आहे.

Total Visitor Counter

3377042
Share This Article