GRAMIN SEARCH BANNER

चिपळूणमध्ये किरकोळ वादातून तरुणाला घरात शिरून मारहाण; एकावर गुन्हा दाखल

Gramin Varta
296 Views

चिपळूण: घराबाहेर ब्रश करताना थुंकल्याच्या शुल्लक कारणावरून आणि वडिलांसोबत असलेल्या जुन्या वादाचा राग मनात धरून एका ४५ वर्षीय व्यक्तीने २५ वर्षीय तरुणाला घरात शिरून काठीने मारहाण केल्याची घटना चिपळूणमधील शंकरवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात रुपेश रामचंद्र बैकर (वय ४५, रा. शंकरवाडी, मारुती मंदिराजवळ) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१) आणि ३३२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १६ मार्च २०२६ रोजी रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास साईकृपा अपार्टमेंट, शंकरवाडी येथे घडली.

या घटनेबाबत फिर्यादी नीरज निवास लोंढे (वय २५, रा. साईकृपा अपार्टमेंट) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटनेच्या वेळी नीरज हे घराबाहेर ब्रश करून खखारे टाकत होते. याचा राग धरून आणि नीरज यांच्या वडिलांसोबत असलेल्या मागील भांडणाचे निमित्त साधून आरोपी रुपेश बैकर याने हातात काठी घेऊन फिर्यादीच्या घरात प्रवेश केला. आरोपीने नीरज यांना काठीने बेदम मारहाण केली आणि त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. या हल्ल्यात नीरज लोंढे हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

या घटनेची गंभीर दखल घेत १७ मार्च रोजी पहाटे ३.३५ वाजता चिपळूण पोलिसांनी रीतसर गुन्हा नोंदवला आहे. गुन्ह्याचा नोंद क्रमांक ७५/२०२६ असून, जुन्या वादातून झालेल्या या मारहाणीमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

Total Visitor Counter

3351258
Share This Article