लांजा : येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील मुजावरवाडी आणि नेवरेकरवाडी येथील नागरिकांना मागील चार महिन्यांपासून कमी दाबाच्या पाण्याचा सामना करावा लागत होता. पाणीपट्टी कर भरूनही विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी होती.
नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या, परंतु नगरपंचायतीचे कर्मचारी महामार्गाच्या ठेकेदार कंपनीच्या कामामुळे अडथळे येत असल्याचे कारण देत जबाबदारी टाळत होते. शेवटी मुजावरवाडीतील महिलांनी नवनियुक्त मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.
कुंभार यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाला बोलावून जाब विचारला आणि त्वरित कार्यवाहीचे आदेश दिले. परिणामी मे महिन्यापासून रखडलेला प्रश्न अवघ्या दोन दिवसांत मार्गी लागला असून परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथील रहिवासी असलेले कुंभार यांना लांजा नगरपंचायत कार्यालयात रुजू होऊन अवघा एक महिना झाला आहे. यापूर्वी ते मंडणगड नगरपंचायतीमध्ये कार्यरत होते. रुजू झाल्यापासून नागरिकांची अनेक रखडलेली कामे मार्गी लावल्याने तरुण, कार्यतत्पर मुख्याधिकाऱ्यांकडून लांजावासीयांच्या अपेक्षा वाढल्या आहेत
लांजावासीयांना दिलासा : मुख्याधिकारींच्या हस्तक्षेपाने चार महिन्यांचा पाणीप्रश्न दोन दिवसांत मार्गी
