तहसीलदार, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
लांजा : राज्य शासनाच्या ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे लांजा शहरासह तालुक्यातील सुमारे ३०० हून अधिक विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना असून त्यांच्या शिक्षणावर गडद सावट निर्माण झाले आहे. आपल्याला अकरावी प्रवेश मिळणार की नाही? या संभ्रमात असलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर सोमवारी लांजात पालक वर्ग आणि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता व्यक्त करत त्यांनी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली.
यावर्षीपासून अकरावीच्या प्रवेशासाठी शासनाने ऑनलाईन प्रणाली लागू केली आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये सातत्याने तांत्रिक अडचणी व नियोजनाच्या त्रुटी आढळल्याने अनेक विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश मिळू शकलेला नाही. शाळा आणि महाविद्यालयांना सुरुवात होऊन दोन महिने उलटून गेले असतानाही विद्यार्थ्यांचे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत.
सद्ध्या प्रवेशाची चौथी फेरी सुरू असून त्यामध्येही अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. पाचव्या फेरीत देखील प्रवेश मिळाले नाहीत, तर शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता संस्थेच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील नैराश्य आणि पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी तसेच शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ प्रचलित ऑफलाइन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू करावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनप्रसंगी न्यू एज्युकेशन सोसायटी लांजाचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, ज्येष्ठ संचालक महंमद रखांगी, सचिव महेश सप्रे, संचालक अॅड.अभिजीत जेधे यांच्यासह अनेक पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.