रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप परिसरात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामामुळे सोमवारी रात्री अपघाताची घटना घडली. मिर्या–नागपूर महामार्गावर सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण व दुरुस्तीच्या कामादरम्यान टेम्पो खड्ड्यात घसरून उलटल्याने चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास घडली.
महामार्गावर विविध ठिकाणी रस्ता खणण्यात आल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. साळवी स्टॉप येथेही रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पुरेशी सूचना फलक व प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अचूक अंदाज येत नाही. याच कारणामुळे संबंधित टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टेम्पो थेट खड्ड्यात जाऊन उलटला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी चालकाला बाहेर काढले. सुदैवाने चालकास गंभीर इजा झाली नसून प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, महामार्गावरील सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था व सूचना फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
साळवी स्टॉप येथे महामार्गावरील काम ठरले अपघातास कारण; टेम्पो उलटून चालक जखमी






