GRAMIN SEARCH BANNER

देवरुखातील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात आणखी एकाला नांदेडमधून अटक; अटक केलेल्यांची संख्या नऊवर

Gramin Varta
174 Views

देवरुख : शहरातील प्रसिद्ध सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात देवरुख पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीस नांदेड येथून अटक करण्यात आली असून, अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या आता नऊ झाली आहे.

शुभम दत्ता सुनेवाड ( रा. वसरणी, ता. जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री देवाख पोलिसांच्या पथकाने नांदेड येथे धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.

देवरुख येथील सोन्याचे व्यापारी धनंजय केतकर यांचे १७ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास देवरुख–साखरपा मार्गावरील वांझोळे परिसरातून अपहरण करण्यात आले होते. अज्ञात आरोपींनी केतकर यांच्याकडील सुमारे १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व २० हजार रुपये रोख रक्कम लुटून त्यांना वाटूळ येथील पुलाखाली सोडून दिले होते.
या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यासाठी रत्नागिरी अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा तसेच लांजा व देवाख पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

तपासादरम्यान साखरपा येथील दोन स्थानिकांवर संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तपासात हे अपहरण रॅकेट मुंबई ते बदलापूरपर्यंत कार्यरत असल्याचे उघड झाले. टप्प्याटप्प्याने आठ आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणातील एक आरोपी नांदेड येथे असल्याची माहिती देवरुख पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने तातडीने कारवाई करत शुभम सुनेवाडला अटक केली. आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम देवरुख पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या चौकशीतून आणखी पसार आरोपी पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Total Visitor Counter

3206546
Share This Article