संगमेश्वर: संगमेश्वर तालुक्यात भातकापणीची कामे सुरू असतानाच, नदीकिनारी आणि पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असलेल्या भागांमध्ये शेतकऱ्यांनी आता ‘वायंगणी’ म्हणजेच रब्बी हंगामातील पिकांच्या तयारीला सुरुवात केली आहे. खाडीपट्टा आणि परचुरी परिसरातील शेतकरी या हंगामी शेतीच्या कामात व्यस्त झाले असून, भातशेती कापणीची २५ टक्के कामे पूर्ण होताच, आता त्यांचे लक्ष वायंगणी पिकांवर केंद्रित झाले आहे.
भाताच्या मुख्य पिकाव्यतिरिक्त या वायंगणी शेतीला तालुक्यात मोठे महत्त्व आहे. शास्त्री, सोनवी, बावनदी आणि असावी यांसारख्या नद्यांच्या गोड्या पाण्यावर ही शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या हंगामाला प्रारंभ होतो. यंदा मुसळधार पावसामुळे भातकापणीची कामे काहीशी लांबणीवर पडली असली तरी, शेतकरी सकाळच्या वेळी भातकापणी आणि झोडणीची कामे आटोपून लगेचच वायंगणी शेतीच्या मशागतीला लागले आहेत.
ओझरखोल आणि परचुरी या भागांसह बावनदी, वांद्री आणि डिंगणी खाडीपट्ट्यात ही वायंगणी शेती प्रामुख्याने केली जाते. या हंगामात शेतकरी हरभरा, पावटा, मूग, कुळीथ यांसारखी कडधान्ये घेण्यावर भर देतात. यासोबतच भाजीपाला म्हणून मुळा आणि पावटा (शेंग) यांची लागवडही केली जाते. या ग्रामीण भागातील वायंगणी शेतीतील ताजी भाजी व पिके स्थानिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आणली जातात, ज्यामुळे अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो.
भातशेती इतकेच वायंगणी शेतीला महत्त्व असल्यामुळे शेतकरी लगबगीने जमिनीतील तण काढून मातीची मशागत करत आहेत. अनेक ठिकाणी महिला बचत गटांच्या माध्यमातून शेतीचे मळे फुलवण्याचे काम उत्साहाने सुरू आहे. एकंदरीत, भातकापणी संपताच संगमेश्वरचे शेतशिवार आता वायंगणी पिके फुलवण्यासाठी सज्ज झाले असून, शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीमध्ये पूर्णपणे गुंतलेले दिसत आहेत.