रत्नागिरी: आषाढी वारी काही दिवसांवर येऊन ठेपली असताना, लाखो वारकरी आणि भाविकांसाठी एसटी महामंडळाने विशेष तयारी केली आहे. पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवास मिळावा यासाठी राज्यभरातून तब्बल ५ हजार ३०० एसटी बसेस विविध मार्गांवरून धावणार आहेत. या नियोजनाचा एक भाग म्हणून, रत्नागिरी आगारातून ५० विशेष एसटी बसेस पंढरपूरकडे रवाना होतील. एसटी विभागाने रत्नागिरीकरांना या सेवेचा लाभ घेऊन जास्तीत जास्त बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांतून लाखो वारकरी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, त्यांच्या प्रवासाची सोय व्हावी यासाठी एसटी महामंडळाने यंदाही ५ हजारांहून अधिक बसेसचे नियोजन केले आहे. रत्नागिरी आगारातूनही जादा बसेस सोडण्याचे नियोजन सुरू असून, सध्या अंदाजे ५० बसेस पंढरपूरला धावतील असे निश्चित झाले आहे. मागील वर्षी रत्नागिरीतून ३० बसेस धावल्या होत्या, त्यामुळे यंदा ही संख्या वाढवण्याचे आगाराने ठरवले आहे. भाविकांनी वेळेत तिकीट बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढी वारीनिमित्त एसटी महामंडळाने नेहमीप्रमाणेच महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास करता येणार आहे, तर महिला आणि ६५ वर्षांवरील नागरिकांना अर्धे तिकीट आकारले जाईल. या सवलतींचा लाभ घेऊन वारकरी आणि भाविकांनी एसटीच्या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन आगारामार्फत करण्यात आले आहे.