थेट पंतप्रधानांकडे कोट्यवधींचा महसूल बुडाल्याची तक्रार
दापोली :दापोली तालुक्यात शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय तब्बल ७० जांभा चिरा खाणींचा बेकायदेशीर धडाका सुरू असल्यामुळे डोंगर, शेतजमिनी आणि परिसरातील पर्यावरणाचा समतोल गंभीररित्या बिघडला आहे. या अवैध उत्खननामुळे प्रशासनाच्या डोळ्यांदेखत नैसर्गिक साधनसंपत्तीची उघड लूट होत असतानाही शासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मुबीन शौकत मुल्ला (आश्टेकर) यांनी या संपूर्ण गंभीर प्रकरणाची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
मुबीन मुल्ला यांनी आपल्या निवेदनात स्पष्टपणे म्हटले आहे की, दापोली तालुक्यातील या जांभा चिरा खाणींवर शासनाची पूर्णतः नजर असतानाही, काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे आणि आशीर्वादाने हे बेकायदेशीर उत्खनन दिवसाढवळ्या सुरू आहे. या अवैध खाणींमुळे खाणधारकांचे मनोबल वाढले असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रात्रंदिवस सुरू असलेल्या या खाणकामामुळे ट्रक, डंपर आणि जेसीबी यांचा परिसरात मोठा धुमाकूळ सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाचा माल वाहून नेणाऱ्या या वाहनांमुळे तालुक्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. परिसरातील नागरिकांना धूळ, मोठा आवाज आणि वाढलेल्या प्रदूषणाचा सततचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी डोंगर अक्षरशः पोखरले जात असल्याने नैसर्गिक भूभाग नष्ट होत आहे, तर गावच्या हद्दीतील मौल्यवान शेतजमिनींचीही मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे गंभीर चित्र आहे.
मुल्ला यांनी पुढे सांगितले की, दापोली तालुक्यात सुरू असलेल्या या बेकायदेशीर जांभा चिरा खाणींमुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे, मात्र तरीही संबंधित विभाग याकडे डोळेझाक करत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी दाखल करूनही प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी मौन बाळगले आहे, ज्यामुळे काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमतामुळेच हा बेकायदेशीर धंदा फोफावला आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर मुल्ला यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या सर्व जांभा चिरा खाणींची तात्काळ आणि कसून तपासणी करून, संबंधित खाण मालकांसह त्यांना पाठिंबा देणाऱ्या भ्रष्ट अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून बुडालेले शासन महसूल खात्याचे नुकसान भरून काढावे, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे.
दापोली तालुक्यातील जनतेत या प्रकरणामुळे संतापाची भावना अधिकच तीव्र झाली आहे. “आमच्या डोंगर-टेकड्या आणि निसर्ग संपत्तीची अशी उघड लूट सुरू आहे, तरीही शासन मात्र गप्प आहे,” अशी तीव्र नाराजी आणि संताप स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.