संगमेश्वर: तालुक्यातील कुरधुंडा-कोळंबे सीमेवरील कोळंबे बस स्टॉपच्या मागे असलेल्या झाडीझुडपात एका ४२ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने कुरधुंडा आणि कोळंबे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आशिष प्रकाश मोहिते (वय ४२, रा. कुरधुंडा, बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत आशिष मोहिते हे दारूचे व्यसनी होते आणि ते घरी कोणालाही न सांगता दोन-तीन दिवस बाहेर राहत असत. दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजल्यापासून ते कोळंबे येथे जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परतले नाहीत. आशिष घरी न आल्याने, खबर देणारे (फिर्यादी) प्रकाश विठोबा मोहिते यांनी त्यांची गावात आणि नातेवाईकांकडे चौकशी केली होती. मात्र, त्यांची कोणतीही माहिती न मिळाल्याने, ते कुठेतरी नातेवाईक किंवा मित्रांकडे असतील आणि लवकरच घरी परततील, असे समजून अधिक चौकशी करण्यात आली नव्हती.
परंतु, मंगळवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आशिष मोहिते घरी परतले नाहीत. याच दिवशी, मयत आशिष यांचा मित्र नितेश जाधव याच्याकडून प्रकाश मोहिते यांना माहिती मिळाली की, कुरधुंडा-कोळंबे सीमेवरील बस स्टॉपच्या मागे असलेल्या झाडीझुडपात आशिष यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडून आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकाश विठोबा मोहिते यांनी याबाबतची खबर संगमेश्वर पोलीस ठाण्यात दिली.या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी एएमआर क्रमांक ३३/२०२५, बी.एन.एस. (भारतीय न्याय संहिता) कलम १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. संगमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.