रत्नागिरी (प्रतिनिधी): स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), रत्नागिरी यांच्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून रत्नागिरी नगर परिषद आणि जिल्हा परिषद पोमेंडी बीटमधील २० होतकरू विद्यार्थिनींना आज सायकलींचे वाटप करण्यात आले. रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात आयोजित एका शानदार समारंभात हा वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी व्यासपीठावर एसबीआय स्थानिक मुख्य कार्यालय, मुंबई मेट्रो येथील मुख्य व्यवस्थापक श्रीमती मंजू शर्मा, महाप्रबंधक श्रीमती बिंदू जनार्दन, उपमहाप्रबंधक श्री. शैलेश मिश्रा, आणि क्षेत्रीय प्रबंधक श्री. अमित चौधरी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नगर परिषद प्रशासन अधिकारी प्रा. सुधाकर मुरकुटे आणि दामले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांचीही उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मुख्य व्यवस्थापक श्रीमती मंजू शर्मा यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया ही केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक क्षेत्रातही तितक्याच प्रभावीपणे आपले सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निभावत असल्याचे सांगितले. यापुढेही बँक शिक्षणासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभागी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. विद्यार्थिनींना सायकलरूपी केलेली ही मदत त्यांच्या पुढील वाटचालीस नेहमीच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास श्रीमती शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविकात प्रा. सुधाकर मुरकुटे यांनी एसबीआयसारखी भारतीयांची बँक शहरातील व ग्रामीण भागातील मुलींच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत असल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या सायकल वाटपासाठी २० विद्यार्थिनींची निवड करताना त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी तसेच घर ते शाळा यातील दूरचे अंतर या सर्व बाबींचा विचार करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले. या मदतीमुळे तालुक्यातील दुर्गम भागातील मुलींच्या चेहऱ्यावर जो आनंद फुलला, तोच या कार्यक्रमाचे खरे फलित असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या कार्यक्रमादरम्यान प्रा. मुरकुटे यांनी श्रीमती मंजू शर्मा व उपस्थित इतर मान्यवरांचा शाल व सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव केला. कार्यक्रमाचे स्वागत मुख्याध्यापक श्री. भगवान मोटे यांनी केले, तर सूत्रसंचालनाची धुरा श्री. रवींद्र शिंदे यांनी सांभाळली. यावेळी नगर परिषद शाळांचे सर्व मुख्याध्यापक, पोमेंडी बीटमधील लाभार्थी विद्यार्थिनी, त्यांचे पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसबीआयच्या या स्तुत्य उपक्रमामुळे अनेक होतकरू विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला आहे.