युवासेना रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
रत्नागिरी : “पक्षाने आजवर दिलेल्या सर्व पदांना प्रामाणिकपणे न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. आता माझी नवी इनिंग सुरू झाली आहे. माझी जबाबदारी आणखी वाढली असून, युवासेनेची भक्कम बांधणी करून शिवसेनेला बळकटी आणणे आणि माझ्या शिवसेनेचे गतवैभव परत मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय असेल. यासाठी वरिष्ठांनी मला फ्री हँड काम करण्याची मुभा द्यावी. भविष्यात कदाचित काही कटू निर्णयही घ्यावे लागतील; पण त्यामुळे संघटनेचे तसूभरही नुकसान होणार नाही याची हमी मी आपणास देतो,” असा विश्वास युवासेना रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी दिला.
नवनिर्वाचित युवासेना रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांचा सत्कार सोहळा आज (१८ ऑक्टोबर) शिवसेना नेते तथा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात झाला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
ते म्हणाले, “युवसेनेच्या जिल्हाधिकारीपदी माझी नियुक्ती जाहीर झाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. एका लढवय्या संघटनेचा जिल्हाप्रमुख होणे हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे. खऱ्या अर्थाने ही माझ्या कामाची पोच पावती आहे असं समजतो कारण मी वयाच्या १०व्या वर्षापासून संघटनेचे झेंडे लावतोय ते आजपर्यंत आणि या पुढेही ते काम सुरू राहील.”
“भारतीय विद्यार्थी सेनेचा कॉलेज उपाध्यक्ष म्हणून मी माझी राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यानंतर शिवसेनेचा उपविभाग प्रमुख झालो. युवासेनेचा पहिला तालुका प्रमुख म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर शिवसेना शहर संघटक पद सांभाळले. हे पद सांभाळत असताना संघटनेच्या संघर्षाच्या काळात पुन्हा माझ्यावर युवासेना तालुकाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. या सर्व पदाला मी प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता माझी नवी इनिंग सुरू झाली आहे. माझी जबाबदारी आणखी वाढली आहे,” “युवसेनेची भक्कम बांधणी करून शिवसेनेला बळकटी आणणे आणि माझ्या शिवसेनेचे गतवैभव परत मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय असेल. यासाठी वरिष्ठांनी मला फ्री हँड काम करण्याची मुभा द्यावी. भविष्यात कदाचित काही कटु निर्णयही घ्यावे लागतील; पण त्यामुळे संघटनेचे तसूभरही नुकसान होणार नाही याची हमी मी आपणास देतो. यासाठी आपले सहकार्य अपेक्षित आहे,” असे शेवटी ते म्हणाले.
खऱ्या अर्थाने एका निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया शिवसेना उपनेते, माजी आमदार बाळासाहेब माने यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.
यावेळी शिवसेना उपनेते, माजी आमदार बाळासाहेब माने, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, प्रवीण साळवी, सलिल डाफळे, विजय देसाई, बिपीन शिवलकर, साजिद पावसकर, अमित खडसोडे, प्रशांत सुर्वे, रोहित मयेकर, दीपंकर भोळे, रूहान सिकंदर, निलेश पवार, साहिल कोकरे, नयन साळवी, राजेश सुर्वे, सुमित नागवेकर, दिलावर गोदड, आशिष कांबळे, संभाजी सावंत देसाई, रशीदा गोदड, उन्नती कोळेकर, गंधाली मयेकर, रेश्मा कोळंबेकर, हीना दळवी, पूजा जाधव, राजश्री शिवलकर, सेजल बोराडे, मिताली पवार, निखिल बने, पारस साखरे, अमन राणे, विश्वास राणे, संदेश नारगुडे यांच्यासह शिवसेना युवासेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.