GRAMIN SEARCH BANNER

आंबोलीत पर्यटक आणि स्थानिकांमध्ये मारामारी; पोलीस कर्मचाऱ्यालाही धक्काबुक्की

Gramin Search
17 Views

सिंधुदुर्ग : आंबोली येथे पर्यटनासाठी आलेल्या गोवा राज्यातील काही तरुणांनी आणि बांदा येथील स्थानिक तरुणांमध्ये किरकोळ वादातून मारामारी झाल्याची गंभीर घटना घडली आहे. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना सुरू झालेला हा वाद थेट सावंतवाडी पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला, विशेष म्हणजे यावेळी मध्यस्थी करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मंगळवारी बांदा बाजारपेठ बंद असल्याने, बांदा येथील पाच तरुण आंबोली येथील निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. आंबोली घाट उतरत असताना, त्यांनी गोवा राज्यातील दुचाकीस्वारांना बाजूला होण्यास सांगितले. याच कारणावरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला. गोवा राज्यातील सुमारे १० ते १५ तरुण आंबोली पर्यटनस्थळावर एकत्र जमले आणि त्यांनी बांदा येथील तरुणांच्या कारचा पाठलाग सुरू केला.

दाणोली येथील पोलीस नाक्यावर बांदा येथील तरुणांची कार थांबताच, गोवा राज्यातील तरुणांनी एकत्र येत हेल्मेटने कारवर आपटत दादागिरी केली. यानंतरही त्यांचा पाठलाग सुरूच राहिला. सावंतवाडी बस स्थानकासमोरील बांधकाम विभागाच्या वळणावर त्यांनी कारसमोर दुचाकी आडवी लावून अपघातासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आबा पिळणकर आणि सुनील नाईक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेऊन सामंजस्य घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र गोवा राज्यातील तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलीस ठाण्याच्या आवारातही गोवा राज्यातील तरुणांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. बांदा येथील कारचालकही त्यावेळी तिथे पोहोचले होते. पोलिसांनी विचारपूस करत असतानाच, गोवा राज्यातील तरुणांनी पोलिसांशी हुज्जत घातली आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एका पोलीस हवालदाराच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात नेऊन एक्स-रे काढण्यात आले.

या घटनेनंतर पोलीस उपनिरीक्षक सरदार पाटील, शरद लोहकरे, अमित राऊळ, आबा पिळणकर, सुनील नाईक आणि अन्य पोलिसांनी गोवा राज्यातील तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोवा राज्यातील तरुणांना आंबोली पर्यटनाची झिंग चढल्याप्रमाणे त्यांनी उद्धट भाषा वापरली आणि पोलिसांशीही झटापट केली, असे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण हे पोलीस ठाण्यात नसले तरी, त्यांनी मोबाईलवर बोलताना याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास सांगितले असल्याचे म्हटले आहे. या प्रकारामुळे आंबोलीसारख्या शांत पर्यटनस्थळी अशा घटनांमुळे पर्यटनाला गालबोट लागत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.

Total Visitor Counter

3199495
Share This Article