रत्नागिरी : शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसर रविवारी सायंकाळी अक्षरशः मृत्यूच्या थराराने हादरला. सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव वाहनाने स्पीड ब्रेकजवळ जोरदार धडक दिल्याने वृद्ध महिला रस्त्यावर कोसळली आणि क्षणातच तिच्या अंगावरून गाडी गेल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. काही क्षणांतच त्या ठिकाणी भीषण दृश्य निर्माण झाले.
या दुर्घटनेत सुनीता राजेश साळवी (वय ७०, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांचा जागीच गंभीर जखमी होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, धडकेनंतर महिला रस्त्यावर फेकली गेली आणि वाहन थांबण्याआधीच तिच्या अंगावरून गेल्याने परिस्थिती अधिक भयावह बनली. रस्त्यावर पसरलेले रक्त पाहून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तातडीने महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. त्या ब्युटी पार्लर व्यावसायिक असल्याचे समजते. अचानक घडलेल्या या अपघाताने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ब्रेकिंग : रत्नागिरी लाला कॉम्प्लेक्सजवळ दुचाकीस्वार महिलेच्या अंगावरून गाडी गेल्याने महिलेचा मृत्यू






