GRAMIN SEARCH BANNER

देवरुख एसटी स्टँड परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; एकाच दिवशी तिघांना घेतला चावा

हिंसक कुत्र्यांचा बंदोबस्त करा,गाव विकास समितीचे नगरपंचायतला पत्र

देवरुख (प्रतिनिधी): देवरुख शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, यामुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः देवरुख एसटी स्टँड परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून शनिवार, १८ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी तीन व्यक्तींना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून देवरुख परिसरात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एसटी स्टँड हा नेहमी गजबजलेला परिसर असल्याने तेथे प्रवासी, शालेय विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने असतात. मात्र, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या वावरामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १८ एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडे कारवाईची मागणी

या गंभीर समस्येची दखल घेत ‘गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा’ यांच्या वतीने देवरुख नगरपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे आणि सौ. दीक्षा खंडागळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची विनंती केली आहे.

नगरपंचायत यावर काय ठोस उपाययोजना करणार, याकडे आता देवरुखवासीयांचे लक्ष लागले आहे. पावसाळा जवळ येत असतानाच अशा घटना वाढल्याने प्रशासनाने तातडीने हिंसक कुत्र्यांना पकडून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Total Visitor Counter

3309590
Share This Article