रत्नागिरी:शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट गुरे वाहतुकीला अडथळा ठरत असून अपघातांचे प्रमाणही वाढत आहे. मोकाट गुरांमुळे होणाऱ्या त्रासाला कंटाळलेले नागरिक आता नगर परिषदेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा व्यक्त करत आहेत. ही समस्या लक्षात घेत शुक्रवारपासून नगर परिषद प्रशासन स्तरावरून या मोकाट गुरांची धरपकड मोहीम हाती घेण्यात आली आहे. एकाच दिवशी एकूण 42 मोकाट गुरांना पकडण्यात येऊन चंपक मैदान येथील कोंडवाड्यात टाकण्यात आले आहे.
रस्त्यावर गुरे मोकाट फिरतात, अपघात होतात, वाहतूक खोळंबते आणि तरीही नगर परिषद काहीच करत नाही, अशी खंत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. यापूर्वी नगर परिषदेने मोकाट गुरांना पकडण्यासाठी मोहीम राबवली होती. त्यासाठी चंपक मैदान येथील जागेत कोंडवाडा उभारून लाखो रुपये त्यावर खर्च केलेत. तरीही हा प्रश्न सुटण्याचे नाव घेत नाही. परिणामी, शहरातील मोकाट गुरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
रत्नागिरी हे कोकणातील महत्वाचे शहर मानले जाते. येथे पर्यटन आणि व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोक येतात. मात्र, मोकाट गुरांचा प्रश्न सुटत नसल्याने शहराच्या प्रतिमेवरही परिणाम होत आहे. स्वच्छ आणि सुंदर रत्नागिरीचे स्वप्न साकार ही समस्या गांभिर्याने सोडवण्यी गरज निर्माण झाली आहे. शहरातील साळवी स्टॉपपासून मुख्य रस्त्याससह अनेक गजबजलेल्या चौकात, गल्लीबोळात, शासकीय कार्यालयाच्या आवारातही या मोकाट गुरांचा वावर सर्वाधिक दिसतो. गुरे रस्त्यावरच तळ ठोकून बसतात, ज्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठी अडचण ठरत आहे.
विशेषत: बाजारपेठेत परिसरात कचऱ्यावर गुजराण करताना दिसतात. या मोकाट गुरांचा वाढता उपद्रव गांभिर्याने घेत त्यांना पकडण्याची मोहीम नगर परिषदेने हाती घेतली आहे. शुकवारी शहराच्या विविध भागातून एकूण 42 गुरांना पकडण्यात आले. त्यात गायी 24, बैल 3, तर लहान-मोठी वासरे 15 इतकी संख्या आहे. त्यांची रवानगी चंपक मैदान येथील उभारलेल्या कोंडवाड्यात करण्यात आली आहे.