GRAMIN SEARCH BANNER

राजापूर : ओणी येथे टेम्पो – दुचाकीचा भीषण अपघात; तरुण गंभीर

Gramin Varta
253 Views

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावर ओणी पेट्रोल पंपासमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मंगळवार, १६ डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला असून, या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरेश सुरेश भितळे (वय ३६, रा. मंदरूळ गणेशवाडी) हे आपल्या ताब्यातील हिरो एक्स्ट्रीम मोटारसायकलने (क्रमांक एम.एच. ०८ बीजे १७७५) ओणी येथून तिवंदामाळच्या दिशेने जात होते. याच वेळी समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या निळ्या रंगाच्या टाटा ४०७ टेम्पोच्या (क्रमांक एम.एच. ०४ बी वाय ३२४२) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपले वाहन अतिवेगात आणि बेदरकारपणे चालवले. ओणी पेट्रोल पंपासमोर या टेम्पोने हरेश भितळे यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या धडकेत भितळे यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर वैभव शांताराम मासये यांनी राजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून टेम्पो चालक हुसेन अब्दुल पाटणकर (वय ४६, रा. वाकेड खालचीवाडी, लांजा) याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) (ब) तसेच मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

जखमी हरेश भितळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, महामार्गावरील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Total Visitor Counter

3199542
Share This Article