रत्नागिरी : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून शेकत बसलेल्या चांदेराई येथील एका महिलेचा आगीत भाजल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सेजल संतोष गुरव (वय ४२, रा. चांदेराई बाजारपेठ, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव असून, मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सेजल गुरव यांना थंडी वाजत असल्याने त्यांनी राहत्या घराबाहेर शेकोटी पेटवली होती. शेकोटीजवळ शेकत बसलेल्या असताना त्यांच्या गाऊनला पाठीमागून विस्तव लागला आणि क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. या दुर्घटनेत त्या ४० ते ४५ टक्के भाजल्या होत्या. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, जिथे पोलिसांनी त्यांचा जबाबही नोंदवला होता. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी ५ जानेवारी २०२६ रोजी त्यांना मुंबईतील मसिना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
मसिना हॉस्पिटलमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११:३९ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शेकोटी पेटवताना झालेल्या या भीषण अपघातामुळे चांदेराई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






