GRAMIN SEARCH BANNER

राजापुरात प्रशासनाचा आदेश धुडकावून रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या १३ जणांवर गुन्हे

Gramin Varta
276 Views

राजापूर : शहरात नगर परिषदेने आखून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे मासे विक्री करणाऱ्या १३ जणांविरुद्ध राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास नगर परिषदेच्या शिवाजीपथ रोड ते बाजारपेठ या परिसरात ही कारवाई करण्यात आली. नगर परिषदेचे स्वच्छता मुकादम राजन रामचंद्र जाधव यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून सुमाया बोरकर, नाजिया वाडकर, निलोफर होडेकर, मिनाज भाटकर, रुक्षना बोरकर, अनिसा सोलकर, नाजिया मंचेकर, सलीम काझी, मुमताज फडणीस, नसरीन सोलकर यांच्यासह एकूण १३ जणांवर महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेचे स्वच्छता निरीक्षक अमित पोवार आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशानुसार शिवाजीपथ भागात मासे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

यावेळी रस्त्यावर बसलेल्या महिलांना मच्छी मार्केटमध्ये जाऊन विक्री करण्याच्या सूचना वारंवार देण्यात आल्या, मात्र या विक्रेत्यांनी नगर परिषदेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत त्याच ठिकाणी विक्री सुरू ठेवली. सार्वजनिक रस्त्यावरच मासे साफ करून टाकली जाणारी खवले आणि सांडपाणी यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण होत आहे. या अनधिकृत व्यवसायामुळे पादचारी नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासकीय कारवाईला न जुमानणाऱ्या या विक्रेत्यांवर अखेर कायदेशीर बडगा उगारण्यात आला आहे.

Total Visitor Counter

3343581
Share This Article