GRAMIN SEARCH BANNER

“गाव विकास समिती” चा ‘विकासाचा अजेंडा’ प्रस्थापितांसाठी डोकेदुखी; देवरुख- संगमेश्वरच्या राजकारणात नवी चर्चा

Gramin Varta
221 Views

रणांगण/एम. काझी

देवरुख/संगमेश्वर: संगमेश्वर तालुका आणि ग्रामीण राजकारणात ‘गाव विकास समिती’ची इंट्री ही प्रस्थापित, साचेबद्ध राजकीय पक्षांसाठी मोठी डोकेदुखी ठरू लागली आहे. केवळ निवडणुकीपुरता प्रचार न करता, थेट लोकहिताच्या भूमिका आणि विकासाच्या ठोस योजना मांडल्यामुळे, प्रस्थापित राजकारण्यांनाही नाइलाजाने का होईना, गाव विकास समितीने ठरवलेल्या विकासाच्या अजेंड्यावर येऊन बोलावे लागत आहे.

याची चुणूक विधानसभा निवडणुकीतही पाहायला मिळाली होती. गाव विकास समितीने त्यावेळी एमआयडीसी विकास, दर्जेदार हॉस्पिटल, शिक्षण आणि पायाभूत सुविधा हे कळीचे मुद्दे घेऊन प्रचार केला होता. मतदारांनी त्यावेळी समितीकडे पाठ फिरवली असली, तरी इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांनादेखील या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करावी लागली होती. पराभवानंतरही समितीने हे विकासाचे मुद्दे सोडले नाहीत.

गाव विकास समितीचे संघटन प्रमुख श्री. सुहास खंडागळे, अध्यक्ष श्री. उदय गोताड, आणि श्री. राहुल यादव हे रत्नागिरी जिल्हा व संगमेश्वर तालुक्याच्या विकासावर सातत्याने आक्रमकपणे आपली भूमिका मांडत असतात.

सध्या सुरू असलेल्या देवरुख नगरपंचायत निवडणुकीतही समितीने हाच विकासाचा धागा पकडला आहे. समितीच्या उमेदवार सौ. दीक्षा खंडागळे यांनी देवरुखमधील नागरिकांना दररोज ३०० लिटर पाणी मोफत देण्याची क्रांतिकारी योजना जाहीर केली आहे. इतकेच नव्हे, तर ‘स्मार्ट मीटर लावून जितका पाणी वापर, तितकेच बिल’ अशी घोषणाही त्यांनी केली आहे. थेट जनतेला कायमचा दिलासा मिळेल अशी ही भूमिका असल्याने, या निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलीच रंगत येऊ लागली आहे.

समितीचे देवरुख निवडणूक प्रभारी डॉ. मंगेश कांगणे यांनीदेखील देवरुखच्या विकासाची खात्री देताना, जी कामे होणार आहेत, तेच सांगणार, खोटी आश्वासने देणार नाही,असे स्पष्ट केले आहे.
एकंदरीत, गाव विकास समिती आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसली तरी, त्यांच्या विचारांनी आणि विकासाच्या ठोस मुद्द्यांनी त्यांनी प्रस्थापित राजकारणासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. समिती आर्थिक दृष्टीने कमकुवत असली तरी विचारांनी प्रचारात रंगत आणत आहे,अशी चर्चा आता सामान्य मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

Total Visitor Counter

3072146
Share This Article