GRAMIN SEARCH BANNER

आरवली येथे मिनी बसने उभ्या कारला चिरडले; दोन चिमुकल्यांसह चार जखमी

Gramin Varta
21 Views

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; आमदार शेखर निकम मदतीला धावले

आरवली: मुंबई-गोवा महामार्गावर आरवलीजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या मिनी बसने उभ्या असलेल्या एका कारला धडक दिल्याने त्यात दोन महिला आणि दोन लहान मुलांसह चौघे जखमी झाले. ही घटना रविवारी संध्याकाळी ४ वाजता घडली असून, अपघातानंतर मिनी बसचा मद्यधुंद चालक आणि त्याचा सहकारी घटनास्थळावरून पळून गेले. अपघाताच्या वेळी याच मार्गाने जात असलेले चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी तातडीने थांबून जखमींना मदत केली. त्यांनी रुग्णवाहिकेद्वारे जखमींना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

गुहागर येथील (एम.एच. ०४ एलवाय ६६७६) क्रमांकाची आयशर मिनी बस प्रवाशांना रत्नागिरी येथे सोडून परत येत होती. आरवली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळील वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकाला धडकून पंक्चर काढण्याच्या दुकानात घुसली. त्याचवेळी पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या मारुती वॅगनआर कारला (एमएच ०२ बीजे १५१२) बसने जोरदार धडक दिली आणि अक्षरशः चिरडले.

या अपघातात कारमधील अबोली कल्पेश घडशी (३२), रुद्रा रुपेश घडशी (२९), ऋग्वेद कल्पेश घडशी (५), आणि कियारा रुपेश घडशी (३) हे जखमी झाले. हे सर्वजण मुंबईहून गणपतीसाठी आपल्या मूळ गावी संगमेश्वर तालुक्यातील आंबव-पोंक्षे येथे आले होते. गाडी पंक्चर झाल्याने ते थांबले होते, त्याचवेळी हा अपघात घडला. अपघातानंतर चालक रवी अरुण झाल्टे आणि त्याचा सहकारी जंगलात पळून गेले, मात्र पोलिसांनी बसमध्ये चालकाचा परवाना मिळवला आहे. अपघाताची माहिती मिळताच माखजनचे सहायक पोलीस निरीक्षक विवेक साळवी आणि त्यांचे सहकारी सोमनाथ खाडे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला.

Total Visitor Counter

3200085
Share This Article