GRAMIN SEARCH BANNER

कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले; ऐन हंगामात प्रवाशांचे प्रचंड हाल

Gramin Varta
117 Views

रत्नागिरी:  कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक गेल्या दोन दिवसांपासून पूर्णपणे विस्कळीत झाले असून, त्याचा मोठा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे. मे महिन्याच्या सुट्ट्यांमुळे गाड्यांना आधीच प्रचंड गर्दी असताना, आता ३ ते ५ तासांच्या विलंबाने धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांच्या मनःस्तापात मोठी भर पडली आहे. नांदगाव रोड आणि कणकवली स्थानकांदरम्यान अंडरपासच्या बांधकामासाठी ३० एप्रिल आणि १ मे रोजी घेण्यात आलेल्या विशेष ‘ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक’मुळे ही वाहतूक विस्कळीत झाली असून, तांत्रिक काम पूर्ण होऊनही रेल्वेचे वेळापत्रक अद्याप पूर्वपदावर आलेले नाही.

या विस्कळीत वेळापत्रकामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा रेल्वे प्रशासनाकडून बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये मांडवी एक्स्प्रेस सीएसएमटीवरून सुमारे ३ तास उशिराने सुटली, तर जनशताब्दी एक्स्प्रेस मडगाववरून तब्बल ५ तास २४ मिनिटे उशिराने मुंबईला पोहोचली. कोकण कन्या एक्स्प्रेस २ तास ४८ मिनिटे, तर दादर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस १ तास ४८ मिनिटे उशिराने धावत होती. एलटीटी-मडगाव एक्स्प्रेस दोन्ही बाजूंनी सुमारे ५ तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत उभे राहावे लागले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असले तरी, वाहतूक नेमकी कधी सुरळीत होईल याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.

मे महिन्याची सुट्टी आणि सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावर सध्या प्रवाशांचा महापूर लोटला आहे. शनिवारी अवघ्या तीन तासांच्या अंतरात सात गाड्यांची ये-जा झाली, मात्र या सर्व गाड्यांमध्ये झालेली अभूतपूर्व गर्दी पाहता आरक्षित डब्यात शिरणेही प्रवाशांना कठीण झाले होते. केवळ जनरलच नव्हे, तर स्लीपर आणि चक्क एसी डब्यांमध्येही पाय ठेवायला जागा नसल्याने महिनाभर आधी आरक्षण केलेल्या प्रवाशांनाही आपल्या हक्काच्या जागेवर बसणे मुश्कील झाले. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता सावंतवाडीपर्यंत एक स्वतंत्र जलद रेल्वे सेवा कायमस्वरूपी सुरू करावी, अशी मागणी आता प्रवाशांमधून जोर धरू लागली आहे. रेल्वेच्या या नियोजित गोंधळावर प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Total Visitor Counter

3356351
Share This Article