रत्नागिरी: गोळप कट्ट्याच्या जून महिन्यातील तिसऱ्या शनिवारच्या ६८ व्या कार्यक्रमात राम आळी, रत्नागिरी येथे गेली ३५ वर्षे रस्त्यावर उभे राहून कपडे विक्री करणारे आणि मूळचे सातारा जिल्ह्यातील श्री. प्रभाकर एकल यांनी आपले संघर्षमय जीवन आणि व्यावसायिक यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. श्री. अविनाश काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली, ज्यातून एकल यांच्या प्रवासाचे विविध पैलू उलगडले.
लहानपणीच पितृछत्र हरवले, पण उमेद नाही सोडली:
एकल यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात करताना सांगितले की, त्यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील मेहमानगड असून, त्यांचा जन्म रत्नागिरीत झाला. वडील रत्नागिरीत शिपायाची नोकरी करत असताना, ते पाच वर्षांचे असताना पंढरपूर वारीला गेले आणि परत आलेच नाहीत. त्यानंतर मामांनी त्यांना गावी नेले, जिथे त्यांनी चौथीपर्यंत शिक्षण घेतले. परिस्थितीमुळे त्यांना पुढे शिक्षण घेता आले नाही.
आर के टेक्स्टाईलमध्ये बारा वर्षांचा अनुभव:
त्यांच्या नात्यातील आर के टेक्स्टाईलचे मालक रामदास कवितके यांनी त्यांना आपल्या दुकानात कामाला ठेवले. १९७८ ते १९८९ अशी बारा वर्षे त्यांनी तिथे काम केले. या काळात त्यांना जेवण, कपडे आणि राहण्याची सोय मिळाली. नोकरी करत असतानाच, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा त्यांच्या मनात रुजली.
शून्य भांडवलातून सुरू झाला व्यवसाय:
१९८७ साली त्यांचे लग्न झाले, परंतु परिस्थितीमुळे त्यांना पत्नीला माहेरीच ठेवावे लागले. १९८९ च्या शेवटी त्यांनी नोकरी सोडली. संतोष क्लॉथ स्टोअरच्या मालकांनी त्यांना उदारपणे दहा हजार रुपयांचा माल उधारीवर दिला. हाच माल घेऊन त्यांनी आज जिथे त्यांचा व्यवसाय आहे, त्याच राम आळीत रस्त्यावर कपडे विकायला सुरुवात केली. जमा झालेले पैसे ते लगेच फेडून टाकत असत. हळूहळू त्यांनी पत्नीला रत्नागिरीला आणले आणि आईसह भाड्याच्या घरात राहायला लागले. पत्नी आणि आई यांनी जेवणाचे डबे देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्यांना संसाराला मोठा हातभार लागला.
कष्ट आणि प्रामाणिकपणाचे फळ:
ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे त्यांचा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. त्यांनी गावी थोडी शेती घेतली आणि पैसे जमा झाल्यावर २००१ मध्ये ब्लॉक बुक केला. २००७ मध्ये ते स्वतःच्या घरात राहायला गेले. त्यांना चार अपत्ये असून, त्यांनी चौघांनाही पदवीपर्यंत शिक्षण दिले आहे. दोन मुली आणि एका मुलाचे लग्न झाले असून, त्यांना नातवंडेही आहेत. एका मुलीचे लग्न अजून बाकी आहे. नाचणे रोडला त्यांनी एक गाळा घेतला असून, तो भाड्याने दिला आहे, ज्यातून त्यांना चांगले भाडे मिळते. त्यांचा मुलगा मोबाईल दुकान चालवतो, जे भाड्याने घेतले आहे.
एकल यांनी सांगितले की, “खूप कष्ट केले, निराश न होता मेहनत घेतली, म्हणूनच मी आज हे दिवस पाहू शकलो. माझ्या कुटुंबाची मला खूप साथ मिळाली. मी प्रामाणिक आणि इमानदारीने व्यवसाय केला. बेईमानी थोड्या दिवसांची असते, पण इमानदारी कायम टिकते.” ते रोज १२ ते १३ तास उभे राहून व्यवसाय करतात, तर शनिवार, रविवार, दिवाळी आणि जत्रेच्या वेळी रात्री उशिरापर्यंत काम करतात. त्यांच्याकडे आता आजोबांपासून नातवंडांपर्यंतची पिढी ग्राहक म्हणून जोडली गेली आहे. ग्रामीण भागातील ग्राहक त्यांचे अधिक आहेत. व्यवसायात सध्या खूप स्पर्धा असली तरी, इमानदारी आणि कष्ट घेतले तर त्याचा फरक पडत नाही, असे ते आवर्जून सांगतात.
तरुणांसाठी प्रेरणादायी संदेश:
आजच्या तरुणांना संदेश देताना एकल म्हणाले, “कोणत्याही ठिकाणी नोकरीत असो वा व्यवसायात, कष्ट करा, चिकाटी ठेवा, निराश होऊ नका. रिकामे बसू नका, तर दिवस नक्की बदलतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.”
श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी सांगितले की, “मनाने ठरवले आणि जिद्द असली तर सगळे शक्य आहे.” ऑनलाइन खरेदीची त्यांना कोणतीही स्पर्धा वाटत नाही, कारण त्याचा परिणाम दुकाने आणि शोरूम यांना होतो. त्यांच्या व्यवसायात ग्राहक कपडे बदलून मिळतील, खात्रीचे मिळतील यासाठी त्यांच्याकडूनच खरेदी करतात. त्यांचा ग्राहकवर्ग वेगळा आहे. ते रोखीनेच व्यवहार करतात आणि नातेवाईक किंवा मित्रमंडळी असली तरी आधी पैसे घेतात, कारण व्यवहारात फक्त व्यवहार आणि नात्यांच्या वेळी नाती महत्त्वाच्या असतात. भविष्यात जमेल तोपर्यंत हाच व्यवसाय करायचा असून, आयुष्यात ते खूप समाधानी आहेत आणि त्यांना कोणतीही महत्त्वाकांक्षा नाही, कारण आयुष्याने त्यांना खूप काही दिले आहे.
कार्यक्रमाच्या समारोपात, ॲड. अविनाश काळे यांनी सध्याच्या युवकांपुढे चिकाटी, कष्ट यांचा आदर्श असावा, निराश, झटपट पैसे हवे अशा आणि बेरोजगार युवकांनी प्रभाकर एकल यांचे आयुष्य पाहून त्यातून प्रेरणा घ्यावी आणि कष्टाने आपले आयुष्य घडवावे यासाठी श्री. प्रभाकर एकल यांना बोलावल्याचे सांगितले. यानंतर श्री. एकल यांचा शाल, श्रीफळ, झाड आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला आणि कार्यक्रमाची सांगता झाली. पुढील महिन्यात तिसऱ्या शनिवारी पुन्हा एका वेगळ्या व्यक्तीबरोबर भेटण्याचे आश्वासन ॲड. अविनाश काळे यांनी दिले. (मो. ९४२२३७२२१२)