GRAMIN SEARCH BANNER

जमीन सपाटीकरणाच्या वादातून चिपळूणमध्ये हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
135 Views

चिपळूण: तालुक्यातील निरबाडे येथे जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला लाकडी काठीने आणि थापडांनी बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी तिघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. जमिनीचे सपाटीकरण करण्याच्या कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी विश्वानंद भीम महाडीक (वय ४८, सध्या रा. कळंबोळी, नवी मुंबई) हे मूळचे निरबाडे येथील रहिवासी आहेत. रविवारी १५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ते आपल्या गावातील जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी डबर टाकून चिपळूणच्या दिशेने गाडीने परतत होते. यावेळी निरबाडे पश्चिमवाडीच्या कमानीजवळ आरोपी रोहन विलास महाडीक आणि विशाल विलास महाडीक यांनी जमिनीच्या वादातून मनात राग धरून विश्वानंद यांची गाडी अडवली. त्यांना गाडीतून खाली उतरवून विशाल महाडीक याने हाताच्या थापडांनी डोळ्यावर, कानावर आणि नाकावर मारहाण केली. तर रोहन महाडीक याने हातातील चिव्याच्या काठीने त्यांच्या दंडावर, पायावर आणि पाठीवर प्रहार करून त्यांना जखमी केले.

यावेळी तिथे उपस्थित असलेला फिर्यादींचा सख्खा भाऊ दयानंद भीम महाडीक यानेही त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून ‘तुला बघून घेतो’ अशी धमकी दिली. या मारहाणीत विश्वानंद महाडीक यांना शारीरिक दुखापत झाली असून, त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती कथन केली. या तक्रारीवरून पोलिसांनी रोहन महाडीक, विशाल महाडीक आणि दयानंद महाडीक या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२) आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3369178
Share This Article