GRAMIN SEARCH BANNER

पाली बाजारपेठेतील अपघातास कारणीभूत ठरणारे उंच गटार तोडण्याची मागणी

Gramin Varta
260 Views

पाली : मुंबई–गोवा महामार्गावरील पाली बाजारपेठ ते सुतारवाडी या मार्गाच्या तोंडावर चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आलेले उंच गटार हे स्थानिक नागरिक, वाहनचालक आणि पादचारी यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. या उंच गटारामुळे वाहनांना आत-बाहेर करताना तीव्र चढाव व उतार निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे हे गटार तातडीने तोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

महामार्गावरील पाली बाजारपेठ परिसरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारची उंच गटारे बांधण्यात आली असून, बाजारपेठ ते सुतारवाडी जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या वळणावरचे हे गटार अपघातप्रवण ठिकाण बनले आहे. अनेकदा दुचाकीस्वार या ठिकाणी वाहन घसरून पडले असून, काही वेळा चारचाकी वाहने तीव्र उतारामुळे अनियंत्रित होऊन महामार्गावर घुसण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

या ठिकाणी उड्डाणपूलाचे काम सुरू असल्याने रस्ता आधीच अरुंद झाला आहे. परिणामी वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याच रस्त्यावर बँका, पतसंस्था, दवाखाने, दुकाने, लॅबोरेटरी, मैदान, व्यायामशाळा आणि शाळेकडे जाणारा मार्ग असल्याने हा रस्ता दिवसभर वर्दळीचा असतो.

ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांना या उंच गटारावरून जाणे अत्यंत अवघड झाले आहे. चारचाकी वाहनांची खालची बाजू गटाराला आपटून नुकसान होत आहे. त्यामुळे या चुकीच्या बांधकामाचा सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने पुनर्विचार करून गटार तोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी इशारा दिला आहे की — “जर अपघात झाला, तर त्याची जबाबदारी संबंधित विभाग आणि कंत्राटदार यांच्यावरच राहील.”

Total Visitor Counter

3374171
Share This Article