GRAMIN SEARCH BANNER

संघशताब्दीनिमित्त संघ गंगा के भगीरथ नाटकाचा रत्नागिरीत गुरुवारी प्रयोग

Gramin Varta
40 Views

रत्नागिरी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी यात्रेनिमित्त ”संघ गंगा के तीन भगीरथ; हे नाटक रत्नागिरीत येत्या गुरुवारी, दि. ७ ऑगस्ट रोजी आयोजित केले आहे. रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी आणि तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब देवरस या महान व्यक्तींच्या जीवनावर आधारित ही नाट्यकृती आहे.

संस्कार भारती संस्थेने या नाट्यप्रयोगाचे आयोजन केले आहे. या नाटकाचा प्रयोग येत्या गुरुवारी दि. ७ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता मारुती मंदिर येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. पुणे आणि नागपूर येथील राधिका क्रिएशन प्रस्तुत हे नाटक दोन अंकी आहे.

नाटक लेखक श्रीधर गाडगे यांनी लिहिले असून दिग्दर्शन संजय पेंडसे, निर्माती सारिका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस यांचे आहे. डॉ. हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली, गोळवलकर गुरुजींनी संघाचा विस्तार केला आणि देवरस यांनी संघटनेला अनुशासन आणि दृष्टी दिली. त्यामुळे हे नाटक सर्वांनाच संघ म्हणजे काय हे समजावून देणारे आहे.

हा नाट्यप्रयोग रत्नागिरीकरांसाठी विनामूल्य आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश असून प्रयोगापूर्वी किमान १५ मिनिटे पोहोचावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य गेली १०० वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. हा सतत वाहणारा प्रवाह आहे. गंगेप्रमाणे निरंतर वाहतो आहे. म्हणून याला संघगंगा म्हटले आहे. ही गंगा प्रवाहित ठेवणारे हे तीन भगीरथ आहेत. ही भगीरथ परंपरा संघात कायम सुरू आहे. या कार्याचे दर्शन प्रेक्षकांना होण्यासाठी हे नाट्य उभे केले आहे.

पत्रकार परिषदेला संस्कार भारतीतर्फे अध्यक्ष विनायक तथा राजू जोशी, कौस्तुभ सावंत आणि अनिल दांडेकर उपस्थित होते.

Total Visitor Counter

3199509
Share This Article