GRAMIN SEARCH BANNER

पेढे ग्रामविकास मंडळाच्या वतीने ‘वाचनालय आपल्या दारी’ उपक्रम

Gramin Varta
117 Views

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर चिपळूण आणि पेढे ग्रामविकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘वाचनालय आपल्या दारी’ उपक्रम सुरु झाला. वाचन चळवळ वाढावी, समाजात वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि पेढे ग्रामविकास मंडळ यांनी नुकताच पेढे कोष्टेवाडी येथील कामधेनू मंदिरात महिला वाचकांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी रागिणी वारे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले.

पेढे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सुनील पडवेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लोटिस्मा ग्रंथालयाचे कोषाध्यक्ष सुबोध दीक्षित ‘यांनी वाचनाची आवश्यकता आणि वाचनाचे कायदे’ याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वाचनालयाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी वाचनालय, कलादालन, वस्तुसंग्रहालय या वाचनालयाच्या उपक्रमांविषयी माहिती देऊन माहिती देऊन वाचनालयात भेट देण्याचे उपस्थितांना आवाहन केले. पेढे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रामप्रसाद कान्हेरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला. कान्हेरे यांनी वाचनालयांमध्ये सातत्य दाखवणाऱ्या महिलांसाठी रोख बक्षीस जाहीर केले. मंडळाचे उपाध्यक्ष गजानन भोसले, सदस्य जनार्दन मालवणकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा माधुरी वारे यांनी मनोगते व्यक्त केली. लोटिस्मा वाचनालयातर्फे ५० पुस्तकांचा संच उपस्थित महिलांच्या स्वाधीन करण्यात आला. साखळी योजनेनुसार दरमहा नवीन पुस्तके देऊन पाहिली पुस्तके जमा करणे असा उपक्रम यापुढे राबविण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. महिलांनी ‘लोटिस्मा’च्या उपक्रमाला सहकार्य करण्याचे आणि हा उपक्रम संपूर्ण पेढे गावात राबवून वाचन चळवळीत सहभागी होण्याचे आश्वासन दिले. मंडळाचे सेक्रेटरी दिवाकर जाधव यांनी ‘लोटिस्मा’चे आणि महिलांचे आभार मानले.

Total Visitor Counter

3366680
Share This Article