GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वरनजीक कळंबस्ते येथील रिक्षा – आयशर टेम्पो अपघातप्रकरणी; रिक्षाचालकावर गुन्हा

Gramin Varta
27 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कळंबस्ते कातकरी आंबा येथील धोकादायक वळणावर भरधाव वेगातील रिक्षा उलटून समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोवर आदळल्याने अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालकासह चार प्रवासी जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. ही घटना १७ डिसेंबर रोजी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी निष्काळजीपणे रिक्षा चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी रिक्षाचालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी आयशर टेम्पो चालक ब्रिजेश कुमार दानपत शुक्ला (वय ४८, रा. खेडशी नाका, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी शुक्ला हे आपला आयशर टेम्पो (क्रमांक एमएच ०८ एच २७३९) घेऊन संगमेश्वर बाजारपेठ ते नायरी बाजारपेठ असे जात होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास त्यांची गाडी कळंबस्ते येथील कातकरी आंबा वळणावर आली असता, समोरून काळ्या रंगाची रिक्षा (क्रमांक एमएच ०८ एक्यू ५९६५) भरधाव वेगाने आली. वळणावर रस्त्याचा अंदाज न आल्याने आणि वेगावर नियंत्रण न राहिल्याने रिक्षा अचानक एका बाजूला कलंडली आणि पलटी होऊन थेट टेम्पोच्या उजव्या बाजूला येऊन धडकली.

या अपघातात टेम्पोच्या उजव्या बाजूच्या दरवाजाची काच, इंडिकेटर आणि हेडलाईट फुटून नुकसान झाले. तसेच रिक्षातील प्रवासी अनंत लक्ष्मण पांचाळ, प्रशांत प्रभाकर पांचाळ, विलास विष्णू म्हस्के आणि स्वतः रिक्षाचालक प्रमोद श्रीधर म्हस्के (सर्व रा. शृंगारपूर, ता. संगमेश्वर) हे जखमी झाले. या घटनेनंतर टेम्पो चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलिसांनी रिक्षाचालक प्रमोद म्हस्के याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत आहेत.

Total Visitor Counter

3199496
Share This Article