GRAMIN SEARCH BANNER

आ. शेखर निकम नेतृत्वाचा ऐतिहासिक विजय: जाकीर शेकासन

Gramin Varta
5 Views

आरवली/वार्ताहर : माखजन विभागात राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय ऐतिहासिक व सांघिक विजय आहे. आमदार शेखर निकम यांनी केलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर मतदार लोकांनी विश्वास ठेवत कामांची पोचपावती दिली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केली आहे.

१९९९ नंतर पहिल्यांदाच माखजन विभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजय झाला आहे. १९९२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे  कै. श्रीधर फणसे, १९९७ मध्ये बहुजन विकास आघाडीचे सुरेश भायजे, २००२ व २००७ सालात भारतीय जनता पार्टीचे दीपक जाधव, २०१२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे सौ. समीक्षा दीपक जाधव तर २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सहदेव बेटकर हे जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते.

पंचायत समितीच्या १९९२ मध्ये झालेल्या निवडणुकीत माखजन आरवली मधून इंदिरा काँग्रेसच्या सौ. चांदबिबी शेकासन, १९९७ मध्ये बहुजन विकास आघाडीचे सुरेश कांगणे, २००२ मध्ये भाजपच्या सौ. भुवड, २००७ मध्ये भाजपचे जाकीर शेकासन, २०१२ मध्ये शिवसेनेच्या सौ. नम्रता कवळकर तर २०१७ मध्ये सोनाली निकम पंचायत समिती निवडणुकीत विजयी झाल्या होत्या.

धामापूर तर्फ संगमेश्वर या पंचायत समिती घनातून १९९२ मध्ये शिवसेनेच्या सौ. शालिनी गोवळकर, १९९७, २००२, मध्ये शिवसेनेचे सुभाष नलावडे, २००७ मध्ये भाजपच्या श्रीमती सुनिता चव्हाण, २०१२ मध्ये शिवसेनेचे संतोष डावल तर २०१७ मध्ये शिवसेनेचे सुभाष नलावडे हे निवडून गेले होते.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उबाठातर्फे कडवई विभागातील तसेच शिवसेनेचे संपर्कप्रमुख असलेले सहदेव बेटकर यांना धामापूर तर्फ संगमेश्वर जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देऊन मोठे आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील भायजे या तरुण उमेदवाराने सहदेव बेटकर यांचा ३१०० मतांनी पराभव करून इतिहास घडवला. २०१७ मध्ये शिवसेनेतून निवडून आलेल्या सहदेव बेटकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यामुळे त्यांनी आपल्या सदस्यत्वपदाचा राजीनामा दिला. यानंतर झालेल्या पोटनिवडणूकीत सुशील भायजे यांचा निसटता पराभव झाला, मात्र सुशील भायजी यांनी खचून न जाता चिकाटीने माखजन विभागात संपर्क ठेवत विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. आमदार शेखर निकम यांनी माखजन विभागात वाडीवस्ती, मोहल्यांमध्ये रस्ते, साकव, शाळा दुरुस्ती, दलित वस्तीमध्ये विकास यासाठी गेल्या दहा वर्षांमध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला आहे. आमदार शेखर निकम यांनी केलेली विकास कामे व त्यांचे कणखर नेतृत्व याच्यावर विश्वास ठेवून या निवडणुकीमध्ये मतदार जनतेने आपला कौल राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या पारड्यात टाकून जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुशील भायजे, पंचायत समितीसाठी सौ. प्रिया सुवरे व भाजप महायुतीचे महेश उर्फ बाबा जड्यार यांना भरघोस मतांनी निवडून दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याचे वृत्त माखजन विभागात समजताच एकच जल्लोष करण्यात आला. ठीक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. सायंकाळी महायुतीच्या तिन्ही उमेदवारांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. गुळालाची उधळण, डीजेचा ठेका तसेच फटाक्यांची आतषबाजी यामुळे मार्ग परिसर दणाणून गेला. महायुतीचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने प्रचारात कामं केले. यामुळे हा सांघिक  राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचा हा ऐतिहासिक विजय असून आहे. मतदार जनतेने महायुतीवर टाकलेला विश्वास तिन्ही उमेदवार सार्थ ठरवतील, असा विश्वास अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी व्यक्त केला.

Total Visitor Counter

3082339
Share This Article