GRAMIN SEARCH BANNER

महामार्ग ठेकेदाराचा पाण्यावर घाला; ओझरखोलची पांडवकालीन विहीर गाळात, ग्रामस्थांचे हाल

Gramin Varta
151 Views

संगमेश्वर / एजाज पटेल : ओझरखोल गावातील ऐतिहासिक पांडवकालीन विहीर महामार्ग ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ऐन उन्हाळ्यात ग्रामस्थांची तहान भागवणारी ही विहीर महामार्गाच्या कामामुळे गाळ, माती आणि कचऱ्याने भरून गेली असून, शुद्ध पाण्याचा स्रोत आता दूषित झाला आहे. यामुळे तहानलेल्या ग्रामस्थांवर जंगलात पाणी शोधत फिरण्याची वेळ आली असून, विकासाच्या नावाखाली ठेकेदाराने नैसर्गिक जलस्रोतावर घाला घातल्याचा संताप व्यक्त होत आहे.

गावातील पाच ते सहा वाड्यांतील ग्रामस्थांना उन्हाळ्यात नळपाणी योजनेद्वारे पुरेसे पाणी मिळत नाही. अशा कठीण प्रसंगी ही पांडवकालीन विहीरच लोकांचा एकमेव आधार असते. मात्र, महामार्गाचे काम करताना कोणतेही शास्त्रीय नियोजन न करता रस्त्याच्या खोदाईतील माती आणि दगड थेट विहिरीच्या दिशेने ढकलण्यात आले. पावसाळ्यात ही सर्व माती विहिरीत साचल्याने नैसर्गिक झऱ्यांचे मार्ग बुजले आहेत. सध्या विहिरीभोवती झाडी आणि काटेरी जंगलाचे साम्राज्य पसरले असून, पाणी असूनही ते पिण्यायोग्य राहिलेले नाही. प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांना पुन्हा एकदा पाण्याच्या शोधासाठी वणवण करावी लागत आहे.

काम सुरू असताना ग्रामस्थांनी अनेकदा ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांना विहिरीला धोका पोहोचू शकतो, याची कल्पना दिली होती. मात्र, ग्रामस्थांच्या विनवण्यांकडे आणि सूचनांकडे महामार्ग प्राधिकरणाने व ठेकेदाराने साफ दुर्लक्ष केले. गेल्या दोन वर्षांपासून केवळ ‘लवकरच गाळ काढू’ आणि ‘निधी मिळाल्यावर काम करू’ अशी पोकळ आश्वासने दिली जात आहेत. लोकांच्या मूलभूत गरजेकडे असे दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरल्यास किंवा एखादी दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.

ही विहीर केवळ पाण्याचा साठा नसून ती पिढ्यान् पिढ्या लोकांची जीवनवाहिनी ठरली आहे. महामार्ग विकासाच्या नावाखाली या ऐतिहासिक ठेव्याची नासधूस करून प्रशासनाने ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळ चालवला आहे. प्रशासनाने आता कोणतीही चालढकल न करता तात्काळ विहिरीतील गाळ काढून स्वच्छता करावी आणि विहिरीचे संरक्षण करावे, अन्यथा ग्रामस्थांचा संयम सुटून उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Total Visitor Counter

3388325
Share This Article