रत्नागिरी: राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली पोकळेवाडी येथे राहत्या घराच्या पाठीमागे बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीची दारू विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका ६५ वर्षीय वृद्धावर नाटे सागरी पोलिसांनी कारवाई केली आहे. २ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाऊलवल्ली येथील तुकाराम पांडुरंग पोकळे (वय ६५) हा आपल्या घराच्या पाठीमागील बाजूस विनापरवाना गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई नरेश शांताराम ठिक (वय ३९) आणि त्यांच्या पथकाने दुपारी १२.३० वाजता घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांना ९०० रुपये किमतीची ‘बॉब्स लेमन व्होडका’ (BOBS LEMON VODKA) या गोवा बनावटीच्या १८० मिली मापाच्या एकूण ३० बाटल्या मिळून आल्या.
पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपी तुकाराम पोकळे याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक २४/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची अधिकृत नोंद २ मार्च रोजी दुपारी २.४५ वाजता करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






