GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : निवेंडी तळेकरवाडीतील बंद चिरेखाणीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळला; ओळख पटविण्यासाठी आवाहन

Gramin Varta
127 Views

वैभव पवार / गणपतीपुळे
रत्नागिरी तालुक्यातील वरची निवेंडी तळेकरवाडी येथील विजय पाटील यांच्या बंद असलेल्या चिरेखाणीत गुरुवारी (१५ जानेवारी) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात पुरुष व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच जयगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेजारील चिरेखाणीत काम करणारे कामगार भाऊसाहेब हनुमंत पटेकर यांना संबंधित व्यक्ती बसलेल्या अवस्थेत दिसून आली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ जयगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी तपास केला असता सदर व्यक्ती मयत असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक पाहणीत मृत व्यक्ती अंदाजे ६० वर्षे वयोगटातील असून त्याचा रंग काळसावळा, उंची सुमारे पाच फूट आणि केस वाढलेले असल्याचे आढळून आले. मृताच्या अंगावर कपडे नसून केवळ अंडरपॅन्ट होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही व्यक्ती यापूर्वी खंडाळा परिसरात वेडसर अवस्थेत फिरताना काही कामगारांनी पाहिल्याचे सांगितले आहे. मृत व्यक्तीचे नातेवाईक अद्याप सापडले नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. नातेवाईकांची ओळख पटल्यावर मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.

या घटनेचा पंचनामा जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. सदर अज्ञात व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास तात्काळ जयगड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Total Visitor Counter

3225878
Share This Article