संगमेश्वर / दिनेश आंब्रे: कलेचे माहेरघर असलेल्या कोकणातील निसर्गरम्य परचुरी गावातील उदयोन्मुख रंगकर्मी तथा युवा कलावंत राजन प्रदीप चंदरकर यांनी आपल्या अनोख्या कलेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या आर्ट डिग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे राजन चंदरकर यांचे वडील प्रदीप विश्राम चंदरकर हे परचुरी गावचे उपसरपंच व प्रभारी सरपंच असून, ते गेल्या तीस वर्षांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ‘गुरुकृपा आर्ट चित्र शाळा’ यशस्वीपणे सांभाळत आहेत.
वडिलांची कलेची आवड पाहून लहानपणापासूनच राजन यांच्यामध्येही कला रुजली आणि त्यांनी वयाच्या लहान वयातच मातीची छोटी छोटी गणेशमूर्ती घडवण्यापासून व ती रंगवण्यापासून या क्षेत्रात पाऊल ठेवले. या संपूर्ण प्रवासात त्यांच्या आजी श्रीमती वंदना चंदरकर यांनी खंबीर आधार देत नेहमीच मार्गदर्शन केले आहे, तर प्रदीप चंदरकर यांच्या पत्नी सौ. प्रणाली यांचीही मोलाची साथ लाभत असून, या कुटुंबाला निरंकारी माता सुदिक्षा जी महाराज यांचा अनुग्रह लाभला आहे. यंदा २५ जुलैपासून कारखान्यात युवा कलाकार राजन चंदरकर यांनी रंगकलेला अधिक जोमाने सुरुवात केली असून, वडिलांकडून शिक्षणासोबतच या आधुनिक जमान्यातील नवनवीन कलाकुसरीचे धडेही ते आत्मसात करत आहेत.
प्रदीप चंदरकर यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर गोवा आणि पणजी येथील मोठमोठ्या इमारतींमधील आतील नक्षीकाम, कलाकुसर तसेच अनेक मंदिरांमधील मूर्तींची रंगसजावट अत्यंत रेखीव पद्धतीने साकारली आहे. सध्या त्यांच्या कारखान्यात गणेशमूर्तींसह देवींच्या मूर्ती, सरस्वती देवी आणि गौरीचे मुखवटे रंगवण्याचे व त्यावर आकर्षक कलाकुसर करण्याचे काम सुरू असून, यंदाच्या गणेशोत्सवासाठी सुमारे ३०० च्या आसपास मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून मोबाईल व व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भाविक गणेशमूर्तींची मागणी व निवड करत असून, कुरदुंडा, गावमळा, कोळंबे, ओझरखोल, उक्षी, वांद्री आदी गावांमधून बाप्पाच्या मूर्तींना मोठी मागणी होत आहे.
आगामी १४ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाचा सण असल्यामुळे सध्या चित्र शाळेत मूर्ती रंगवण्याची जोरदार लगबग पाहायला मिळत आहे. आमच्या कुटुंबाचा विकास ग्रामीण भागात याच पारंपरिक कलेमुळे झाला असल्याचे मत प्रसिद्ध गणेशमूर्तिकार प्रदीप चंदरकर यांनी ग्रामीण वार्ताच्या विशेष प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले असून, एका तरुण विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच आपल्या वडिलांच्या पारंपरिक कलेचा हा वारसा समर्थपणे पुढे चालवणे संपूर्ण संगमेश्वर तालुक्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब ठरली आहे.






